Jalgaon District Information In Marathi जळगांव जिल्हा महाराष्ट्र राज्यात उत्तर पश्चिमेकडे वसलेला जिल्हा असुन सातपुडा पर्वत रांगांनी वेढलेला आहे, याच्या दक्षिणेकडे अजिंठा पर्वत रांगा आहेत. धुळे, जळगाव व नंदूरबार या दोन्ही जिल्ह्यांचा प्रदेश मध्ययुगीन काळापासून खान्देश या नावाने ओळखला जातो.तर चला मग जळगाव जिल्ह्याविषयी आणखी सविस्तर माहिती पाहूया.
जळगाव जिल्ह्याची संपूर्ण माहिती Jalgaon District Information In Marathi
प्रशासनाच्या दृष्टीने ब्रिटीशांनी 1906 मध्ये खान्देशचे पूर्व खान्देश व पश्चिम खान्देश असे दोन जिल्ह्यात विभाजन केले. जळगाव मुख्यालय असलेला 10 तालुके व तीन पेठ्यांचा मिळून पूर्व खान्देश जिल्हा होता.
क्षेत्रफळ व विस्तार :
क्षेत्रफळ 11,771 चौ.किमी. असून विस्तार 20° 22′ उ. ते 21°23′ उ. व 74° 55′ पू. ते 76° 28′ पू. याच्या पूर्वेस बुलढाणा व मध्य प्रदेशाचा खांडवा दक्षिणेस औरंगाबाद, पश्चिमेस धुळे व नासिक आणि उत्तरेस मध्य प्रदेश राज्याचे खांडवा व खरगोण हे जिल्हे आहेत.
जळगाव जिल्ह्यातील तालुके :
जळगांव जिल्हयात एकुण 15 तालुके आहेत.
जळगांव, अमळनेर, भडगांव, भुसावळ, बोदवड, चाळीसगांव, चोपडा, धरणगांव, एरंडोल, जामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा, पारोळा, रावेर, यावल.
जळगाव जिल्हा इतिहास :
जळगाव शहराची स्थापना मराठी सरदार तुळाजीराव भोईटे यांनी केली. सरदार तुळाजीराव भोईटे हे साताऱ्याचे संस्थानिक होते. भोईटे कुटुंबाचे पूर्वज दुर्गोजीराव भोईटे हे छत्रपती शाहू महाराजांचे निष्ठावंत सेवक असल्याकारणाने महाराजांकडून त्यांना नशीराबाद आणि जवळील प्रांत अनुदान म्हणून मिळाले होते. भोईटे बऱ्याच काळपर्यंत जळगावचे राज्यकर्ते राहिले. त्यांनी जळगाव येथे एक वाडा बांधला. आज त्या वाड्याला भोईटे गादी म्हणून ओळखले जाते.
नद्या व धरणे :
जिल्ह्याची मुख्य नदी तापी ही पश्चिमवाहिनी व सखोल पात्राची असून हिच्या उपनद्या पूर्णा, गिरणा, वाघूर, भोगावती, बोरी व पांझरा या महत्त्वाच्या आहेत. भोकर, सुकी, मोर, रानवती, हडकी, मंकी, गुळी, अनेर इ. उपनद्या व कान, तितूर, अंजनी इ. नद्या असून त्यांवर अनेक छोटेमोठे बंधारे आहेत. त्यांशिवाय हरताळे, म्हसवे, वेल्हाळे व मेहरूण हे चार तलाव आणि बागायतोपयोगी विहिरी आहेत.
हवामान :
जिल्ह्यात जून ते सप्टेंबर आल्हाददायक पावसाळा असतो. ऑक्टोबरची उष्णता जाणवते. उन्हाळ्यात धुळीचे लोट उठतात. मेघगर्जनेसह वादळ, संभव उन्हाळा, पावसाळा अखेर जास्त असतो. पावसाची वार्षिक सरासरी 74 सेंमी. व त्यातही तापी खोऱ्यात 76 ते 81 सेंमी. असून एकंदरीत पर्जन्यमान जास्त निश्चित स्वरूपाचे आहे.
जिल्ह्यातील हवा कोरडी, आरोग्यदायी पण विषम असून अत्यंत कडक उन्हाळ्यासाठी जळगाव शहर व जिल्हा प्रसिद्ध आहे. उन्हाळा दक्षिणेस कमी आणि सातपुड्यापर्यंत वाढता कडक आहे. नोव्हेंबर- डिसेंबर ते फेब्रुवारी तीव्र थंडी, मार्च ते मे कडक उन्हाळा जळगाव येथे डिसेंबरमध्ये 10° से. व एप्रिलमध्ये 42.5° से. तपमान असते.
वाहतूक :
जिल्ह्यातील 350 किमी. लोहमार्गांपैकी 296 किमी. रुंदमापी व 54 किमी. अरुंदमापी आहेत. मुंबई-भुसावळ-इटारसी, भुसावळ-नागपूर, चाळीसगाव-धुळे व पाचोरा-जामनेर लघुलोहमार्ग असे चार फाटे असून पश्चिम रेल्वेचा सुरत-भुसावळ जोडणारा ताप्ती व्हॅली मार्ग आहे.
पक्के रस्ते-सुरत-धुळे-एदलाबाद-नागपूर हा एकच राष्ट्रमार्ग (क्र. 6) या जिल्ह्यातून 149 किमी. जातो. पुढीलप्रमाणे तीन राज्यमार्ग आहेत : मुंबई-चाळीसगाव 192 किमी. जळगाव-अजिंठा 61 किमी. रायसिंग-बऱ्हाणपूर 114 किमी.
1950 पासून 138 राज्यपरिवहन मार्ग झाले असून त्यांची लांबी 4,091 किमी. आहे.
वनस्पती व प्राणी :
जळगाव जिल्ह्यातील 14.85 % प्रदेश वनक्षेत्र यांनी व्यापला असून त्यात साग, तिवस, धावडा, सलई, सादडा, हळद, शिसव, कळंब, बिब्बा, अंजन, खैर, बाभूळ, बोर, पळस, टेंभुर्णी इ. वृक्ष आढळतात. वाघ, अस्वल, हरिण, सांबर, चितळ, रानडुक्कर, नीलगाय, कोल्हा, खोकड, चिंकरा, ससा इ. वन्यपशूंचा विशेषतः सातपुड्यात मुक्तसंचार असतो. मासे, बगळे व मोर पक्षीही विविध आहेत.
शेती व इतर उद्योग :
या जिल्ह्यात शेती हा मुख्य व्यवसाय असून येथे ज्वारी, गहू इ. धान्ये, कापूस, भुईमूग व तीळ तेले, केळी या पिकांची लागवड केली जाते या व्यतिरिक्त मसाला पदार्थ, शुद्ध वनस्पती तूप, भाजीपाला, कडधान्ये, केळपीठ, सरकी, पेंड, कुक्कुटपालन उत्पादने यांची निर्यात केली जाते.
गाई, म्हशी, बैल व कोंबड्या यांच्या संवर्धनावर व पैदाशीवर विशेष लक्ष केंद्रित केल्यामुळे दूध, अंडी, लोकर, चामडी, वासरे, रेडके यांचे उत्पादन मोठे आहे.
चाळीसगाव येथील पाश्चरायझेशन प्लँटचे दूध मुंबईस रवाना होते. चाळीसगाव येथे श्रेष्ठ संकरित मेंढ्या पैदास केंद्र असून खिलार, निमार जातींची पाच पैदास केंद्रे आहेत. जळगाव, सावदे, चोपडा, जामठी, वरणगाव, नेरी, धरणगाव, वरखेडी, रावेर येथे जनावरांचे बाजार पूर्वापार भरत असून परप्रांतांतही गुरांची विक्री चालते.
जिल्ह्यात हातमाग, यंत्रमाग, सुतारी, चर्मकारी, तेलघाणे, बांबूकाम, कुंभारकाम, लोहारकाम, वीटभट्ट्या, लोकरकाम, गूळ करणे, हातकागद करणे, भांडी घडविणे इ. कुटिरोद्योगांना आणि ग्रामोद्योगांना वाढत्या प्रमाणात उत्तेजन मिळते.
लोक व समाजजीवन :
या जिल्ह्यातील लोकवस्ती साधारण दाट, दर.चौ. किमी. 180 असून स्त्रीपुरुष प्रमाण 949 1000 आहे. 85% लोक मराठी भाषिक, 8% उर्दू भाषिक, 3% गुजराती भाषिक आहेत. जिल्ह्याची बोलीभाषा अहिराणी असून ती विशेषतः पश्चिमेस बोलली जाते. बंजारी, भिल्ल, पावरे (राजपूतवंशीय), तडवी (मुसलमान), गोंड, कोटिल, नहाळ या अनुसूचित जमाती आहेत.
जिल्ह्यात बहुसंख्य हिंदू असून ते एकंदरीत पापभीरू, देवभोळे, सुखवस्तू व उत्सवप्रिय आहेत. नागरी जीवन संमिश्र असून वाढता शिक्षणप्रसार, सामाजिक-आर्थिक बदल, सहजसुलभ दळणवळण यांमुळे जुन्या जातिवर्ण भेदांचा लोप होत आहे. लेवा-पाटीदार समाज हिरिरीने आणि ईर्ष्येने आघाडीवर आहे. 36.60% कामगार असून साक्षरता 45.52% आहे.
पर्यटन स्थळ :
मुक्ताबाई मंदिर मुक्ताईनगर :
प्राचीन देवस्थानांपैकी एक असे संत मुक्ताबाईंच्या मंदीराला भेट देण्याकरता फार दुरून भाविक येथे येत असतात. मुक्ताबाईंचे दोन मंदीरं या ठिकाणी असुन एक मेहुण मंदीर आणि मुक्ताईनगर या ठिकाणी तयार झालेले नवे मुक्ताबाई मंदिर.
श्री क्षेत्र चांगदेव मुक्ताईनगर :
हठयोगी संत श्री चांगदेव यांचे मंदीर मुक्ताईगरपासून 4 किमीवर पूर्णा व तापी नदीच्या संगमावर आहे. हे हेमाडपंथी मंदीर काळ्या संगमरवरी शिळा एकावर एक रचून बांधलेले आहे. जेथे या दोन नद्यांचा संगम होतो तेथे महादेव मंदीर आहे. चांगदेव मंदीर बरेच प्राचीन असून त्याचा उल्लेख अबुल फजल यांच्या ऐने अकबरीत आहे.
मंदिराच्या प्रवेशद्वारावर बाळबोध लिपीतील काही मजकूर आहे. श्री क्षेत्र चांगदेव मंदीर हे 18 व्या शतकात बांधलेले आहे. मंदिराजवळून वाहत असलेल्या तापी व पूर्णा नद्यांना पूर्वी अनुक्रमे चंद्रकन्या व सुर्यकन्या अशी नावे होती.
गांधी तीर्थ, जळगाव :
येथील गांधीवादी विचारवंत व उद्योजक भंवरलालजी जैन यांनी जैन हिल्स परिसरात उभारण्यात ‘गांधी तीर्थ’ साकारले आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते या गांधीतीर्थचे उद्घाटन झाले आहे. निसर्गरम्य परिसरात महात्मा गांधी यांचे जीवनचरित्र, साहित्य, घडामोडी, त्यांची अहिंसा मार्गाची चळवळ, देश-विदेशातील त्यांच्या चळवळींची आठवण करून देणारे हे तीर्थ म्हणजे एक विद्यापीठच ठरले आहे.
पाटणादेवी ता. चाळीसगाव :
पाटणादेवी येथील प्राचीन मंदिराची स्थापना शके 1128 मध्ये झाली असून हे मंदीर हेमाडपंथी कलेचा उत्कृष्ट नमूना आहे. हे मंदीर यादवकालीन असून गौताळा अभयारण्यात येते. हे स्थान पार्वतीचे शक्तीपीठ असून याचा उल्लेख देवी भागवतमध्ये आहे. श्री चंडीकामाता बऱ्याच कुळांची कुलस्वामीनी असून या पवित्र जागृत स्थळाच्या दर्शनासाठी असंख्य भाविक येत असतात.
प्रख्यात गणितज्ज्ञ भास्कराचार्य यांचा जन्म पाटणचाच. त्यांचा येथे जोतीर्विद्येचा खूप मोठा आश्रम होता. भास्कराचार्यांना शून्याचा शोध येथेच लागला असे म्हटले जाते.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करू नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.
हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-
Essay On Metro Rail In Marathi
Essay On World Wildlife Day In Marathi
My Country India Essay In Marathi