Nanded District Information In Marathi नांदेडचे नाव पूर्वी नांदित असे होते. हे प्रामुख्याने शीख गुरुद्वारांसाठी ओळखले जाते आणि येथे भरपूर पुरातन वस्तूंचा संग्रह आढळतो. पांडवांनी वनवासात असताना या जिल्ह्यातून प्रवास केल्याचे महाभारतात म्हटले आहे. तर चला मग पाहूया नांदेड या जिल्ह्याविषयी सविस्तर माहिती.
नांदेड जिल्ह्याची संपूर्ण माहिती Nanded District Information In Marathi
या ठिकाणी एकेकाळी महान राजा अशोकाचे राज्य होते. नांदेड हे मराठी कवी रघुनाथ पण्डित आणि वामन पण्डित यांचे जन्मस्थान आहे.कवी दे.ल. महाजन, कवी वा.रा. कांत, साहित्यिक नरहर कुरुंदकर, इतिहासाचार्य तात्यासाहेब तथा अंबादास कानोले, संगीत महर्षी अण्णासाहेब गुंजकराची ही कर्मभूमी आहे.
क्षेत्रफळ व विस्तार :
क्षेत्रफळ 10,492 चौ. किमी. असून विस्तार 18°15′ उ. ते 19° 55′ उ. अक्षांश व 77° 7′ पू. ते 78° 15′ पू. रेखांश यांदरम्यान आहे. या जिल्ह्याच्या पूर्वेस आंध्र प्रदेश राज्याचे आदिलाबाद व आग्नेयीस निझामाबाद हे जिल्हे असून दक्षिणेस कर्नाटक राज्याचा बीदर जिल्हा आणि आग्नेयीस व पश्चिमेस उस्मानाबाद, पश्चिमेस व वायव्येस परभणी व उत्तरेस यवतमाळ हे महाराष्ट्राचेच जिल्हे आहेत.
नांदेड जिल्ह्यातील तालुके :
नांदेड जिल्ह्यात नांदेड, हदगाव, किनवट, भोकर, बिलोली, देगलूर, मुखेड व कंधार हे आठ तालुके आहेत.
भाषा :
जिल्ह्यात मुख्यतः मराठी, उर्दू, तेलुगू या भाषा व वंजारी ही बोली असून त्या बोलणाऱ्यांचे एकूण लोकसंख्येशी शेकडा प्रमाण अनुक्रमे 73.28, 10.84, 6.34, व 4.56 आहे. यांशिवाय कानडी, हिंदी, गोंडी, पंजाबी, गुजराती व इतर 25 भाषा व बोली अल्प प्रमाणात चालू आहेत. बहुतेक लोकांना मातृभाषेशिवाय आणखी एक-दोन तरी भाषा समजतात.
संस्कृती व समाज :
नांदेड जिल्ह्यात प्रामुख्याने हिंदू, मुस्लिम आणि महत्त्वाची म्हणजे शीख धर्मियांची संस्कृती अस्तित्वात आहे. येथील गोदावरी नदीच्या किनारी नंदी या महादेवाच्या वाहनाने नृत्य केले म्हणून या शहरास नांदेड असे नाव पडले आणि याच्या मुळेच इथे हिंदू संस्कृती अस्तित्वात आली. शीख धर्मियांच्या दहावे गुरू गोविंदसिंग यांचे समाधी स्थळ इथेच आहे ते म्हणजे सचखंड गुरुद्वारा यांच्यामुळेच इथे शीख संस्कृती वसली आहे.
हवामान:
जिल्ह्याचे हवामान कोरडे व विषम असून मे महिन्यात तपमान 40° से. पर्यंत असते. हिवाळा साधारण सौम्य असून तापमान 13° से. असते. पाऊस नैर्ऋत्य मान्सून वाऱ्यांपासून मिळतो. हिवाळ्यातही काही भागांत थोडा पाऊस पडतो. उत्तरेकडून दक्षिणेकडे पावसाचे प्रमाण कमी होत जाते. उत्तर भागात 123.8 सेंमी. तर दक्षिण भागात 85.5 सेंमी. अशी पावसाची सरासरी आहे.
इतिहास :
नांदेड जिल्ह्याचा इतिहास खूप प्राचीन आहे. आजच्या नांदेड जिल्ह्याचा मध्ययुगीन इतिहास एकुण दख्खन पठारावरील राजकीय घडामोडीशी प्रत्यक्ष संबंध ठेवून होता. मराठवाडा, विदर्भ आणि खानदेश या भूप्रदेशात घडणार्या संघर्षाचे पडसाद नांदेड घेण्याअगोदर दख्खन पठारावरील राजकीय स्थित्यंतरे समजुन घेणे महत्वाचे आहे.
इसवी सनाच्या तेराव्या शतकापर्यंत मराठवाड्याचा वरिसर म्हणजेच महाराष्ट्रातील गोदा खोरे, संपन्न अशा राजसत्ताचे माहेरघर होते. इसवीसन पूर्व 5 व्या शतकातील अश्मक आणि मूलक ही दोन्ही महाजनपदे या परिसरातील, त्यानंतर अनुक्रमे सातवाहन, वाकाटक, पुर्वचालुक्य, राष्ट्रकुल, उत्तरचालुक्य, यादव शिलाहार, कलचुरी या राजसत्तांच्या कालखंडात या परिसराने आर्थिक संपन्नता, राजकीय स्थैर्य, प्राचिन व्यापार उदीम उपभोगली. मोठ मोठी व्यापारी शहरे इथे उदयाला आली.
नांदेड हे 1725 साली हैद्राबाद संस्थानाचा हिस्सा झाले आणि 1947 ला भारत स्वतंत्र झाल्यानंतरही निजाम संस्थानने आपले स्वतंत्र अस्तित्व राखल्याने नांदेड हैद्राबाद संस्थानाचाच हिस्सा बनुन राहीले पण भारत सरकारच्या पोलीस कारवाई नंतर 17 सप्टेंबर 1948 रोजी हैद्राबाद संस्थान स्वतंत्र भारत देशात समाविष्ट झाले.
आताचा नांदेड जिल्हा महाराष्ट्र राज्याचा भाग बनलेला आहे. अत्यंत संथ गतीने वाटचाल करणारे मध्ययुगीन सल्तनीतले नांदेड आता झपाटयाने बदलु लागले आहे. नंदीतटाचे नांदेड आता लहान गावठाण राहिले नाही तर शहर बनले, पाहता पाहता शहराचा विस्तार घडत गेला आणि नांदेड महानगरपालिका अस्तित्वात आली.
शेती व्यवसाय :
नांदेड जिल्ह्यातील शेती हा व्यवसाय मुख्य असून येथे बाजरी, तांदूळ, तूर, मूग, भुईमूग, करडई, जवस, उडीद व मिरची ही अन्य खरीप पिकेही काही भागांत होतात. रब्बीच्या पिकांत गहू, हरभरा व ज्वारी या पिकांचा समावेश होतो.
गेल्या काही वर्षांपासून कंधार व नांदेड तालुक्यांत मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड केली जाते. यांखेरीज केळी, द्राक्षे, पालेभाज्या इ. बागायती पिकेही जिल्ह्यात काही ठिकाणी काढतात. एकूण 68% जमिनीत अन्नधान्ये आणि बाकीच्या जमिनीत इतर पिके होतात.
खेळ व मनोरंजन :
खेड्यापाड्यात मुलामुलींचे लंगडी, हुतुतू, विटीदांडू, पोहणे, सुरपारंब्या, फुगड्या, झिम्मा इ. जुने खेळ असतात त्याचप्रमाणे शाळा-कॉलेजांतून लंगडी, खोखो, हुतुतू इ. देशी व पायचेंडू, कडीचेंडू, क्रिकेट इ. परदेशी खेळ प्रचलित आहेत. सिनेमा सर्वत्र लोकप्रिय करमणूक आहे. नाटके विशेषतः शहरी भागात जास्त लोकप्रिय आहेत.
खेड्यांतून, विशेषतः जत्रा, उत्सव वगैरे प्रसंगी, कुस्त्यांचे फड व तमाशा लोकप्रिय आहेत. अलीकडे शाळा-कॉलेजांतून देशी खेळांस व व्यायामप्रकारांस उत्तेजन मिळत आहे. सुसंघटित खेळांच्या दृष्टीने जिल्हा मागासलेलाच आहे. जिल्ह्यात एकूण 16 चित्रपटगृहे व नाट्यगृहे असून 7 फिरती चित्रपटगृहे आहेत.
नद्या व प्रमुख धरणे :
गोदावरी ही नांदेड जिल्ह्यातील प्रमुख नदी असून, परभणी जिल्ह्यातून वाहत येऊन पुढे ती आंध्रप्रदेशात प्रवेश करते. आसना, सीता, सरस्वती व मांजरा, कयाधू व लेंडी या जिल्ह्यातील इतर नद्या आहेत. मांजरा नदी जिल्ह्याच्या पूर्व सीमेवरून, तर पैनगंगा नदी जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून वाहते.
बहुतेक नद्या पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहतात. नांदेडजवळची शंकररावजी चव्हाण विष्णुपूरी उपसा जलसिंचन योजना प्रसिध्द आहे. हा राज्यातील सर्वांत मोठा उपसा जलसिंचन प्रकल्प आहे असे मानले जाते.
गोदावरी नदीवरील हा प्रकल्प नांदेडजवळ असरजन या ठिकाणी असून येथील जलाशयास शंकरसागर असे म्हटले जाते. कंधार तालुक्यातील मन्याड नदीवरील मन्याड, तसेच लेंडी नदीवरील पेठवडज व महालिंगी, मुखेड तालुक्यातील कुंद्राळा,देगलूर तालुक्यातील करजखेड,किनवट तालुक्यातील नाझरी व डोंगरगाव इत्यादी अन्य महत्त्वाची धरणे जिल्ह्यात आहेत.
वाहतूक व्यवस्था :
नांदेड जिल्हा रेल्वे, रस्ते मार्गाने जोडला गेला आहे. नांदेड येथे अद्ययावत व सर्व सोयींनी युक्त असे श्री गुरू गोबिंद सिंगजी विमानतळही आहे. या ठिकाणाहून लवकरच विमानसेवाही सुरु होणार आहे.
त्यामुळे येथून मुंबई, नागपूर आणि दिल्लीसाठी हवाई प्रवासाची सुविधाही सुरू होईल, अशी आशा आहे. रेल्वेद्वारे नांदेड, हैदराबाद, तिरुपती, बंगळुरू, दिल्ली, अमृतसर, मुंबई, पुणे, नागपूर आदी शहरांशी जोडले गेले आहे. नांदेड जिल्हा रस्त्यांद्वारे राज्यातील इतर शहरांसह कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आदी राज्यांशी जोडला गेला आहे.
पर्यटन स्थळ :
नांदेड जिल्ह्यातील प्रमुख धार्मिक व पर्यटनस्थळे पुढील प्रमाणे आहे.
तख्त सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब :
नांदेडचा मुख्य गुरुद्वारा असून सिखांच्या अधिपत्याखालील पाच उच्च जागांपैक एक आहे. त्यामुळे देशभरातून भाविक येथे दर्शनासाठी येतात.
श्री क्षेत्र माहूरगड :
महाराष्ट्रातील एक शक्तिपीठ. रेणुका देवीचे मंदीर असून ते नैसर्गिक सौंदर्यात डोंगरावर वसलेले आहे. तसेच याच परिसरात असलेली माहूरची पांडव लेणी आणि वझरा शेख फरीद धबधबाही माहूरला येणाऱ्या पर्यटकांचे आकर्षण असते.
भुईकोट किल्ला (कंधार) :
हा किल्ला 15 एकरात असून त्याच्या भोवती खंदक आहे. राष्ट्रकुल घराण्यात हा किल्ला राजधानी होता. किल्ल्यावर एक टेहळणी बुरुज असून अनेक तोफा अजूनही चांगल्या स्थितीत बघायला मिळतात.
होट्टल (ता.देगलूर) :
येथे चालुक्यकालीन मंदिरे व शिल्पस्थापत्य अवशेष आहेत. त्यामध्ये सिद्धेश्वर, परमेश्वर, महादेव, सोमेश्वर, रोकबेश्वर, त्रैपुरुषदेव या मंदिरांचा समावेश आहे. चालुक्य काळातील मंदिरस्थापत्याचा अप्रतिम अविष्कार येथे पहायला मिळतो.
सहस्त्रकुंड धबधबा :
पैनगंगा नदीवरील हा धबधबा पर्यटकांचे मन मोहून घेणारा आहे. नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्याच्या हद्दीमध्ये हा धबधबा आहे.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.
हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-
Essay On Importance Of Cleanliness In Marathi
Essay On Save Electricity In Marathi
My Best Friend Essay In Marathi
My Country India Essay In Marathi