सरकारी योजना Channel Join Now

हिंगोली जिल्ह्याची संपूर्ण माहिती Hingoli District Information In Marathi

Hingoli District Information In Marathi मराठवाडा विभागाच्या उत्तर दिशेला हिंगोली जिल्हा आहे. भारतातील पवित्र बारा ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग मानल्या जाणाऱ्या नागनाथ मंदिरासाठी औंढा नागनाथ हे जिल्ह्यातील प्रसिद्ध ठिकाण आहे. चला मग हिंगोली या जिल्हा विषयी सविस्तर माहिती पाहूया.

Hingoli District Information In Marathi

हिंगोली जिल्ह्याची संपूर्ण माहिती Hingoli District Information In Marathi

क्षेत्रफळ व विस्तार :

हिंगोली जिल्ह्याचे क्षेत्रफळ 4526 चौरस कि.मी.आहे. जिल्ह्याचा विस्तार 19° 5′ उ. ते 20° 5′ उ. या अक्षांश आणि 76° 30′ पू. ते 77° 30′ पू.या रेखांशाच्या दरम्यान आहे.

हिंगोलीच्या उत्तरेस  बुलढाणा आणि वाशिम जिल्हा व यवतमाळ जिल्हा, पश्चिमेस परभणी जिल्हा व आग्नेयेस नांदेड जिल्हा आहे. आताचा हिंगोली जिल्हा हा 1 मे 1999 पूर्वीपर्यंत परभणी जिल्ह्याचा एक भाग होता.

लोकसंख्या :

एकूण लोकसंख्या 9,87,160 तर साक्षरता 66.86% इतकी आहे. राज्यातील सिंधुदुर्ग व गडचिरोली जिल्ह्यांखालोखाल हा तिसऱ्या क्रमांकाचा कमी लोकसंख्येचा जिल्हा आहे.

जिल्ह्याचा इतिहास :

हिंगोली जिल्ह्याचा इतिहास खूप प्राचीन आहे. प्राचीन काळात विंगुली, विंग मुल्ह, लिंगोली असा उल्लेख हिंगोलीबद्दल आढळतो. इ. स. 490 मध्ये वाकाटक घराण्यातील सर्वसेन या राजाने वत्सगुल्म नावाची एक शाखा स्थापन केली.

या शाखेची राजधानी तत्कालीन वत्सगुल्म (आताचे वाशिम) राज्यातील नर्सी परगण्यातील हिंगोली एक गाव होते. नंतरच्या काळात कलचुरी, राष्ट्रकूट, चालुक्य, यादव या घराण्यांच्या सत्ताही या प्रदेशात राज्य करीत होत्या.

जिल्ह्यातील औंढा नागनाथ या तीर्थक्षेत्रास आमर्दकक्षेत्र म्हटले जात असे, असा उल्लेख राष्ट्रकूटांच्या ताम्रपटात आढळतो. मध्ययुगीन काळात या प्रदेशावर मोगल, इमादशहा, आदिलशहा, निजामशहा यांचे आधिपत्य होते.

शिखांचे दहावे व अंतिम गुरू गुरुगोविंदसिंह हे पंजाबमधून मोगल बादशहा बहादूरशहा याच्यासमवेत दक्षिणेत आले असता 1708 मध्ये त्यांनी हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे तळ उभा केला होता. जिल्ह्यात एकूण 710 महसुली गावे असून 565 ग्रामपंचायती आहेत. जिल्ह्यात विधानसभेचे तीन, तर लोकसभेचा एक मतदारसंघ आहे.

हवामान :

या जिल्ह्याचे स्थान पठारावरील असल्यामुळे जिल्ह्यातील हवामान उष्ण, कोरडे व विषम आहे. हा प्रदेश उष्णकटिबंधात मोडत असल्यामुळे येथील उन्हाळा कडक असतो. येथील उच्चतम तापमान सरासरी 41.9° से. असते. उन्हाळ्यात कधीकधी तापमानात वाढ होऊन ते 44° ते 45° से. पर्यंत वाढते. हिवाळ्यातील तापमान कमी असते.

या वेळी सरासरी किमान तापमान 12.6° से. असते. हिवाळ्यात उत्तर भारतातून येणाऱ्या थंडीच्या लाटेमुळे येथील तापमान 5° से. ते 6° से.पर्यंत खाली येते. हिंगोली जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 95 सेंमी. आहे. जिल्ह्यात नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याखेरीज ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्यांत ईशान्येकडील परतीचा पाऊस पडतो. त्याचा फायदा रब्बी हंगामातील पिकांना होतो.

भूक्षेत्र :

जिल्ह्याच्या उत्तर भागात अजिंठ्याच्या डोंगररांगा पसरलेल्या आहेत. त्यांना ‘जिंतूर-हिंगोली टेकड्या’ हे स्थानिक नाव आहे. जिंतूर ही जिल्ह्यातील सर्वाधिक उंचीची डोंगररांग असून ह्या रांगेतील शिखराची सर्वसाधारण उंची 533 मी. आहे.

रांगेतील माथ्याचे काही भाग सपाट, तर काही गोलाकार आहेत. या डोंगररांगेतील सपाट पठारी प्रदेशात काही खेडी वसली आहेत. डोंगररांगांच्या पायथ्याचा भूप्रदेश माळरानासारखा आहे. हा प्रदेश खडकाळ असून निकृष्ट गवत व झुडपे यांनी व्यापला आहे.

वनस्पती :

हिंगोली जिल्ह्यात जास्त घनदाट वनक्षेत्र नाही. सर्व वनक्षेत्र विरळ आहे. उत्तरेकडील डोंगराळ भागात वनक्षेत्र आढळते. या वनांमध्ये पानझडी आणि काटेरी झाडेझुडपे आढळतात.

जिल्ह्यातसाग, धावडा, ऐन, खैर, मोह, टेंबुर्णी इ. प्रकारचे वृक्ष असून पावण्या, कुसळी, राज, रोशा इ. प्रकारचे गवत आढळते. बोर, बाभूळ, आयोनी, कोणा इ. काटेरी झाडेही आढळतात. तेंडूपाने, डिंक, मोह फुले व फळे, मध आणि चारोळी इ. वन उत्पादने गोळा करण्याचा व्यवसाय जिल्ह्यात चालतो. रोशा या गवतापासून सुगंधी तेल बनविले जाते.

प्राणी :

हिंगोली जिल्ह्यात पाण्याची कमतरता आणि जंगलाची विरळता यांमुळे जंगली प्राणी व पक्षी फार कमी प्रमाणात आढळतात. बिबट्या, कोल्हा, तरस, लांडगा, रानडुक्कर, सांबर, हरिण इ. प्राणी येथे आढळतात.

इतरत्र अभावाने आढळणारा रोही हा प्राणी येथे विपुलतेने आढळतो. पक्ष्यांमध्ये कबूतर, सफेद तितर, काळे तितर तसेच अल्प प्रमाणात मोर आढळतात. येलदरी, सिद्धेश्वर व इसापूर धरणांच्या बाजूला स्थलांतरित पक्षी प्रामुख्याने हिवाळ्यात आढळतात.

या परिसरात हिरवे कबूतर हा महाराष्ट्राचा राज्यपक्षीही आढळतो. हिंगोली जिल्हा सापांच्या प्रजातींबाबत संपन्न असून त्यात मण्यार, पट्टेरी मण्यार, नाग, घोणस, फुरसे, गवत्या, हरणटोळ, पाणसाप, मांजरसाप इ. सापांचे भिन्न प्रकार आढळतात.

जिल्ह्यातील तालुके :

औंढा नागनाथ, कळमनुरी, बसमत, सेनगांव, हिंगोली.

धार्मिक सण :

या जिल्ह्यात सार्वजनिक दसरा महोत्सव दोनशे वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव, बैलपोळा, श्री नवदुर्गा महोत्सव, भीम जयंती, नागपंचमी, कलगावची यात्रा, हत्ता नाईक ता. सेनगांव येथील कावड आगमन, श्री. कानिफनाथ महाराज यात्रा कानिफनाथ महाराज गड खैरी घुमट, हिंगोलीचा प्रसिद्ध नवसाच्या मोदकाचा चिंतामणी गणपतीचा मोदक उत्सव, मसाई देवी यात्रा वारंगा मसाई.

शेती व्यवसाय :

जिल्ह्यातील 83 % लोक शेतीवर निर्भर आहेत. त्यामध्ये शेतमजुरी व शेतकरी यांचा समावेश होतो. जिल्ह्यात सोयाबीन आणि कापूस ही महत्त्वाची पिके घेतली जातात.

एकूण शेती क्षेत्राच्या 28% भागावर सोयाबीनचे, तर 22% क्षेत्रात कापसाचे पीक घेतले जाते. ज्वारी, तूर, हरभरा, तांदूळ, सूर्यफूल ही पिकेही येथे घेतली जातात.

उद्योग :

औद्योगिक दृष्ट्या हिंगोली इतर जिल्ह्यांपेक्षा मागासलेला आहे. जिल्ह्यात मोठे उद्योगधंदे नाहीत. छोटे उद्योग विखुरलेले आहेत. बहुतांश उद्योग प्राथमिक क्षेत्रातील असून त्यांमध्ये कृषी आधारित उद्योगांचा भरणा जास्त आहे.

नोंदणीकृत उद्योग फक्त 98 असून 38 अनोंदणीकृत उद्योग आहेत. त्यांमध्ये अन्नप्रक्रिया उद्योग, सरकी काढणे व गाठीबांधणे आणि जोडकाम यांचा अंतर्भाव होतो.

जिल्ह्यातील 136 उद्योगांपैकी 131 लघुउद्योग असून फक्त 5 उद्योग मध्यम प्रकारचे आहेत. या पाचमध्ये तीन साखर कारखाने, एक सूतगिरणी व एक तेलशुद्धीकरण कारखाना यांचा समावेश आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वसाहती हिंगोली, वसमत, कळमनुरी येथे असून येथे कृषिसंलग्न उद्योग चालतात.

वाहतूक :

जिल्ह्यातील रस्त्यांची एकूण लांबी 3,606 किमी. असून त्यांपैकी 30 किमी. राष्ट्रीय महामार्ग, 491 किमी. राज्य महामार्ग, 754 किमी. जिल्हा रस्ते, 487 किमी. इतर मार्ग व 1,838 किमी. लांबीचे ग्रामीण रस्ते 2011-12 मध्ये होते.

हिंगोली, कळमनुरी, नांदेड, हिंगोली-औंढा नागनाथ-जिंतूर, हिंगोली-वाशिम हे महत्त्वाचे मार्ग आहेत.

हिंगोली जिल्ह्यातील पर्यटन स्थळ :

असेगाव :

हिंगोली जिल्ह्यातील आसेगाव ता. वसमत हे गाव जैन धर्मियांचे पवित्र तीर्थस्थान आहे. या गावात संपूर्ण महाराष्ट्रातील व इतर भागातील जैन भाविक मोठ्या प्रमाणात येतात.

सिद्धेश्वर धरण

औंढा नागनाथ तालुक्यातील पूर्णा नदीवर सिद्धेश्वर धरण बांधण्यात आलेले आहे. सदर धरणाचा परिसर पर्यटन स्थळ म्हणून विकसीत करण्यासाठी 1 कोटी 30 लाख रुपयांची योजना पूर्ण झाली असून यामध्ये बाग बगीचा, सुशोभीकरण, पर्यटक निवास, अंतर्गत रस्ते व पोच मार्ग निर्माण करण्यात आले आहेत.

नरसी नामदेव :

नर्सी हे संत नामदेव महाराजांचे जन्मस्थान असून त्यांचा इ.स. 1270 मध्ये जन्म झाला होता. नर्सी हे कयाधू नदीच्या काठी वसलेले आहे. येथे प्रत्येक महिन्याच्या एकादशीस व आषाढी एकादशीस मोठी यात्रा भरते. हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनास येतात.

संत नामदेव महाराज हे शिख समाजाचे आदरणीय संतपुरूष असल्याने नांदेड येथील गुरूद्वारा बोर्डाच्या पुढाकाराने येथे गुरूद्वारा, नदीवरील घाट वाहतुकीचे रस्ते, विश्रामगृह आणि व्यापारी संकुल बांधण्याची योजना कार्यान्वित होत असून त्यात महाराष्ट्र शासनाचे मोठे योगदान आहे.

औंढा नागनाथ मंदिर :

भारतातील बारा प्रसिद्ध ज्योतिर्लिंगापैकी एक औंढा नागनाथ हे 8 वे ज्योतिर्लिंग आहे. या मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी असून मुख्य मंदिराभोवती बारा ज्योतिर्लिंगाचे लहान मंदिर आहे. याठिकाणी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते तसेच श्रावणातील प्रत्येक सोमवारी येथे भाविक दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात येतात.

औंढा नागनाथ तालुक्याचे ठिकाण असून हिंगोली पासून 24 कि.मी. अंतरावर आहे. परभणी व नांदेड शहरापासून औंढा नागनाथ साधारणत: 55 ते 60 कि.मी. अंतरावर आहे.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Essay On Importance Of Cleanliness In Marathi

Essay On Save Electricity In Marathi

My Best Friend Essay In Marathi

Essay On Tree In Marathi

My Country India Essay In Marathi

Subhash Chandra Bose Essay In Marathi

My School Essay In Marathi

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment