इंडोनेशिया देशाची संपूर्ण माहिती Indonesia Information In Marathi

Indonesia Information In Marathi भारतीय संस्कृतीचा मोठा प्रभाव इंडोनेशियावर असलेला पाहायला मिळतो. इतकेच नव्हे तर, 20 हजार रुपयांच्या नोटेवर थेट गणपतीचे छायाचित्र पाहायला मिळते. यावरूनच भारतीय संस्कृती, भारतातील देवी-देवता, भारतीय परंपरा, भारतीय तत्त्वज्ञान इंडोनेशियात मोठ्या प्रमाणात मानले जाते, हे सिद्ध होते.तर चला मग पाहूया इंडोनेशिया या देशाविषयी सविस्तर माहिती.

Indonesia Information In Marathi

इंडोनेशिया देशाची संपूर्ण माहिती Indonesia Information In Marathi

जगातील प्राचीन मंदिरांमध्ये गणल्या जाणाऱ्या हिंदू देवतांची अनेक भव्य आणि ऐतिहासिक मंदिरे इंडोनेशियात आहेत. भारतातल्या पुराणांमध्ये याचा उल्लेख दीपांतर भारत म्हणजेच समुद्रापारचा भारत असा आढळतो. दीपांतर हे नाव इंडोनेशियामध्ये अजूनही प्रचलित आहे.

क्षेत्रफळ व विस्तार :

इंडोनेशिया या देशाचे क्षेत्रफळ 19,04,345 चौ. किमी असून विस्तार 6° उ. ते 11° द. आणि 95° पू. ते 141° पू. याचे जास्तीतजास्त पूर्वपश्चिम अंतर 5,029 किमी. व दक्षिणोत्तर अंतर 2,011 किमी. असून याच्या उत्तरेस दक्षिण चिनी समुद्र व पॅसिफिक, पूर्वेस पॅसिफिक आणि दक्षिणेस व पश्चिमेस हिंदी महासागर आहे.

मलाया द्वीपकल्पाच्या पूर्वेकडे न्यू गिनी बेटांपर्यंत इंडोनेशियाचा प्रदेश पसरला असून त्यामध्ये जावा, सुमात्रा, मादुरा, नुसा तेंगारा, मोलूकू, सूलावेसी, कालीमांतान, पश्चिम ईरीआन, तिमोर बेटाचा काही भाग व 3,000 लहान बेटे यांचा समावेश होतो.

आशिया व ऑस्ट्रेलिया ह्यांना साधणारा पूल समजला जाणाऱ्या या देशात भौगोलिक, समाजिक व आर्थिक विविधता तसेच वैचित्र्य भरपूर आहे. जावा बेटावरील जाकार्ता ही इंडोनेशियाची राजधानी आहे.

इंडोनेशियाचे चलन :

इंडोनेशियाची वैधमुद्रा रूपीयाह ही आहे. एका रूपीयाहचे 100 सारखे भाग असून त्यांस सेन म्हणतात. 1969 मध्ये एका अमेरिकन डॉलरला 275 रूपीयाह व एका पौंडाला 660.52 रूपीयाह असा विनिमय दर होता.

लोकसंख्या :

इंडोनेशिया या देशातील लोकसंख्या 2009 च्या जनगणने प्रमाणे 22,99,65,000 एवढी आहे.

भाषा :

इंडोनेशियन भाषा मलायो-पॉलिनीशियन गटात मोडतात. ‘ब्हाशा इंडोनेशिया’ ही अधिकृत भाषा असली, तरी तद्देशीय लोकांच्या 25 निरनिराळ्या भाषा व 250 बोलीभाषा बोलल्या जातात.

इंडोनेशिया देशाचे हवामान :

सर्वच प्रदेशात सर्वसाधारणपणे हवा उष्ण व दमट असून, जून ते ऑक्टोबर व नोव्हेंबर ते फेब्रुवारी अशा आठ महिन्यांत, अनुक्रमे मान्सून व ईशान्य वाऱ्यांपासून भरपूर पाऊस मिळतो. येथील हवेतील सरासरी आर्द्रता 82% असते.

See also  पलाऊ देशाची संपूर्ण माहिती Palau Information In Marathi

समुद्रकिनाऱ्याच्या लगतच्या मैदानी प्रदेशात सरासरी तपमान 27° से. असते. कमाल व किमान तपमानात फार तर 3° से. इतकाच फरक पडतो. त्यामुळे येथे ऋतू नाहीत. ऋतूंऐवजी स्थानाच्या समुद्रसपाटीपासूनच्या उंचीवर हवामान अवलंबून असते. वार्षिक सरासरी पर्जन्यमान 200 सेंमी. पेक्षाही जास्त असते.

संस्कृती व लोकजीवन :

भारतीय व चिनी संस्कृतीचे मिश्रण येथे पहायला मिळते. या देशाचा भारताशी पुरातन संबंध आहे. सुमारे पाचशे वर्षांपूर्वी हा देश एक हिंदू देश होता. परंतु नंतर त्यातले बहुसंख्य लोकांना धर्मांतराने मुसलमान करण्यात आले व हा देश मुसलमान गणला जायला लागला.

इंडोनेशियातील बहुसंख्य लोक मलेशियन ह्या मंगोलॉइड वंशाच्या एका पोटजातीचे आहेत. ते उंचीने खुजे, किंचित कुरळ्या केसांचे व वर्णाने उजळ भुऱ्या रंगाचे आहेत.

मूळच्या मंगोलियन वांशिकांचा हिंदू, अरब, चिनी वगैरे लोकांशी संकर झाल्यामुळे इंडोनेशियातील मलेशियन वंशाचे लोक निराळे बनले आहेत. मूळचे मंगोलियन वंशाचे लोक निराळे बनले आहेत. मूळचे मंगोलियन वंशाचे लोक तुरळकरीत्या अजूनही सुमात्रा, तिमोर, मोलूकू, ईरीआन वगैरे भागांत आढळतात.

इंडोनेशियन लोकांची संस्कृती विविधरंगी दिसते. ह्या संस्कृतीत प्रथमावस्थेतील भटके, शिकारी, कोळी वगैरे लोकांपासून तो थेट अलीकडील पाश्चिमात्य संस्कृतीच्या लोकांपर्यंत निरनिराळ्या प्रमाणातील भेसळ दिसते. ह्यांपैकी काही लोक व संस्कृती अशा आहेत.

इतिहास :

इंडोनेशियाचा इतिहास खूप प्राचीन इतिहास आहे. 2,000 वर्षापूर्वी येथे पूर्वेकडील देशांमधून म्हणजे तैवानमधून लोक आले व त्यांनी हा भागा ताब्यात घेतला, असे मानणारा एक प्रवाह आहे. त्यानंतर त्यांनी भातशेती व इतर कला, कौशल्ये मिळवली.  भारत व चीन या दोन्ही देशांशी असलेल्या व्यापाराने या देशाची संस्कृतीला आकार दिला.

सातव्या शतकात श्रीविजय या नाविक प्रबळ असलेल्या राजाने हिंदू तसेच बौद्ध धर्म यांना स्थान दिले. त्यानंतर शैलेंद्र व मातारम यांनी अनुक्रमे बोरोबदूर व प्रंबनन ही धार्मिक शहरे वसवली. मजापहित हे हिंदू राजघराणे तेराव्या शतकात जावा बेटावर सत्तेत आले. हा काळ इंडोनेशियाच्या इतिहासातले सुवर्णयुग म्हणून ओळखला जातो.

इ.स. 1521 मध्ये येथे पहिल्यांदा युरोप खंडातून  पोर्तुगीज लोक आले. त्यांना येथील मसाल्याचे पदार्थ हवे होते. त्यानंतर ब्रिटिश व डच आले. डच लोकांनी डच ईस्ट इंडिया कंपनी स्थापन करून येथे अंमल बसवला. इ.स. 1800 मध्ये त्यांनी इंडोनेशियाला आपली वसाहत म्हणून घोषित केले.

दुसऱ्या महायुद्धात जपानी आक्रमण पाहिल्यानंतर स्वातंत्र्याच्या भावनेने येथे मूळ धरले.  जपानच्या  शरणागतीनंतर इ.स. 1945 मध्ये सुकार्नो यांनी अध्यक्ष म्हणून सूत्रे हाती घेतली. पण नेदरलँड्सने  आपला अंमल कायम ठेवण्याची धडपड सोडली नाही. शेवटी डिसेंबर इ.स. 1949 मध्ये इंडोनेशियाने स्वातंत्र्य मिळवले.

See also  आइसलँड देशाची संपूर्ण माहिती Iceland Information In Marathi

शेती व्यवसाय :

इंडोनेशियातील 70% लोक शेतीवर उदर निर्वाह करीत असून राष्ट्रीय उत्पन्नाच्या 52% वाटा कृषिउत्पन्नाचा आहे. नांगरटीखाली असलेल्या एकंदर जमिनीपैकी 55% जमीन लहान लहान शेतकऱ्यांकडे असली, तरी तिच्यातून तांदूळ, रबर, चहा, कॉफी, नारळ, मिरी, व इतर मसाल्यांचे पदार्थ, काटेसावर, तंबाखू, भुईमूग, ताडतेल, मका, कसावा, ऊस, सोयाबीन वगैरे महत्त्वाची पिके काढली जातात.

उद्योग धंदे :

हस्तव्यवसाय, कुटिरोउद्योग व प्राथमिक प्रक्रियात्मक उद्योगाशिवाय इंडोनेशियात महत्त्वाचे जड उद्योगधंदे 1945 पूर्वी अस्तित्वातच नव्हते. तेल शुद्धीकरण, भात सडणे, नारळ, ताड, तांदूळ, टॅपिओका, ऊस वगैरे शेतमालावर प्राथमिक प्रक्रिया करणे, असे लघुउद्योग इंडोनेशियन भांडवलावर उभारले गेले होते.

याव्यतिरिक्त कापड उद्योग, बाटिक किंवा तलम कापडनिर्मिती, छपाईचा कागद व शाई तयार करणे, रंगनिर्मिती, लोखंड व पोलाद उद्योग साबण, मार्गारीन, रबरी वस्तू, चामड्याच्या वस्तूचे उद्योग येथे चालतात.

खेळ व मनोरंजन :

इंडोनेशियन लोकांनी बॅडमिंटन आणि फुटबॉल ह्या खेळांत प्रावीण्य मिळविले आहे. इंडोनेशियन खेळाडूंच्या जोडीने बॅडमिंटनच्या टॉमस कप स्पर्धेत 1970 मध्ये आशियाई अजिंक्यपद मिळविले. गोल्फ, टेनिस, कोंबड्यांची झुंज, नौकाविहार, शिकार, पोहणे इ. खेळही तेथे लोकप्रिय आहेत.

नृत्य :

इंडोनेशियाच्या अभिजात नृत्याचे पेंडेट, बेदाया, सेरिम्पी, वायांग, केतजाक, वायांग-टोपेंग आणि लिलिन हे प्रमुख प्रकार आहेत. मुखवट्यांच्या एका विशिष्ट नृत्यास ‘वायांग-टोपेंग’ अशी संज्ञा आहे. मेणबत्ती-नृत्याला ‘लिलिन’ अशी संज्ञा आहे.

ह्यांखेरीज बाली येथील ‘लेगाँग’ हे गूढरम्य आणि सुमात्रा येथील ‘श्लीविद्जाजा’ हे नृत्यप्रकारही प्रसिद्ध आहेत. तेथील नृत्याप्रमाणेच संगीतावरही भारतीय प्रभाव पडलेला आहे.  रामायणामधील विविध प्रसंगांवरील संगीतिका, कळसूत्र बाहुल्यांचे खेळ आणि नृत्यनाटिका तेथे लोकप्रिय आहेत.

इंडोनेशियातील पर्यटन स्थळ :

इंडोनेशियातील बाली, माउंट अगुंग, जावा यांसारख्या भागातील अनेक ठिकाणे केवळ अद्भूत अशीच आहे. इंडोनेशियातील निसर्ग, समुद्रकिनारे आणि एकंदरीत वातावरण पाहून एकदम थक्क होऊन जाल तर चला मग पाहूया कोणकोणती पर्यटन स्थळे आहेत.

​विष्णू मंदिर :

इंडोनेशियातील बाली बेटावर भगवान विष्णूंचे एक मंदिर आहे. आसपासच्या परिसरातील निसर्ग सौंदर्यामुळे या मंदिराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. समुद्रातील एक मोठ्या शिळेवर हे मंदिर आहे. 16 व्या शतकात हे मंदिर बांधण्यात आले होते. अलौकिक सौंदर्यामुळे इंडोनेशियातील पर्यटन स्थळांमध्ये या मंदिराचा पहिला क्रमांक लागतो.

See also  ग्रीस देशाची संपूर्ण माहिती Greece Information In Marathi

शिवलिंगात अमृत :

इंडोनेशियातील जावा बेटावर संशोधन करत असताना एक पुरातन हिंदू मंदिर सापडले. या मंदिरात एक शिवलिंग आढळले असून, या शिवलिंगाची वेगळेच आणि अद्भूत असे महत्त्व आहे.

हे शिवलिंग स्फटिकापासून तयार झाले असून, यातील द्रव पदार्थ आजपर्यंत कधीच सुकला नाही. हा द्रव पदार्थ अमृत असल्याची भावना स्थानिकांची आहे. हा नेमका कोणता पदार्थ आहे, याचा शोध अनेक वैज्ञानिकांनी आणि संशोधकांनी घेतला. मात्र, त्यांना अद्याप यश आलेले नाही.

पुरा बेसकिह मंदिर :

बालीतील माउंट अगुंग येथे हे मंदिर बांधण्यात आले असून, इंडोनेशियातील सर्वांत सुंदर मंदिर म्हणून याची स्वतंत्र ओळख आहे. 1995 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसांच्या यादीत या मंदिराचा समावेश केला.

सरस्वती मंदिर :

बाली येथील उबूद येथे तमन सरस्वती मंदिर प्रसिद्ध आहे. विद्येची आणि संगीताची देवता म्हणून सरस्वती देवीचे येथे पूजन केले जाते. मंदिर परिसरात दररोज सांगितिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच येथील एका कुंडामुळे हे स्थान अधिक लोकप्रिय झाले असून, पर्यटक आवर्जुन येथे भेट देतात.

प्रम्बानन मंदिर :

जावा येथील प्रम्बानन मंदिर त्रिदेवांना म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना समर्पित केलेले आहे. युनेस्कोने हे मंदिर जागतिक वारसा यादीत समाविष्ट केले आहे. या मंदिरात दररोज पूजाविधी केला जातो. तुम्ही इंडोनेशियामध्ये फिरायला गेला तर नक्की या स्थळांना भेट द्या व आनंद घ्या.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment