Meghalaya Information In Marathi मेघालय या राज्याला निसर्गतः सृष्टी सौंदर्य प्राप्त झालेले आहे. मेघालय हे सृष्टीसौंदर्याने नटलेले राज्य आहे. शिलाँग हे राजधानीचे शहर असून येथे अनेक निसर्गरम्य स्थळे आहेत. मेघालय हा पूर्वी आसामचा भाग होता. पण 21 जानेवारी 1972 ला खासी, गारो आणि जैंटिया टेकड्या मिळून या तीन जिल्ह्यांना स्वतंत्र राज्य घोषित करण्यात आले. आता राज्यात सात जिल्हे आहेत.
मेघालय राज्याची संपूर्ण माहिती Meghalaya Information In Marathi
लोकसंख्या व क्षेत्रफळ :
मेघालयाची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेप्रमाणे 3,211,000 इतकी असून राज्याचे क्षेत्रफळ 22,429 चौरस किमी. आहे. मेघालयाच्या उत्तरेस व पूर्वेस भारतातील आसाम राज्य, तर दक्षिणेस व पश्चिमेस बागंला देश आहे. शिलाँग हे राज्याच्या राजधानीचे ठिकाण तसेच राज्यातील सर्वांत मोठे शहर आहे. मेघालय राज्य एकूण 12 प्रशासकीय जिल्ह्यांमध्ये विभागले गेले आहे.
मेघालय इतिहास :
मेघालयाचा इतिहास येथे राहणाऱ्या खासी, जैंतिया आणि गारो या तीन प्रमुख जमातींशी निगडीत आहे. प्राचीन काळापासून या जमाती येथे राहतात. पौराणिक कथेनुसार, खासी हे राज्यातील सर्वात सुरुवातीच्या स्थलांतरितांपैकी एक होते. खासी, जयंती, गारो या जमातींचे स्वतःचे क्षेत्र होते.
1765 च्या सुमारास आसामचा हा प्रदेश ब्रिटिशांच्या ताब्यात गेला. स्वातंत्र्यानंतर, 1954 मध्ये, या भागातील रहिवाशांनी वेगळ्या राज्याची मागणी केली, जी राज्य पुनर्रचना आयोगाने फेटाळली. ही मागणी शांततेत व्हावी या हेतूने 1960 मध्ये ‘सर्व पक्षीय हिल लीडर्स’ची स्थापना करण्यात आली. या आंदोलनांमुळे सप्टेंबर 1968 मध्ये भारत सरकारने आसाम राज्यात राहून मेघालयला स्वायत्त राज्याचा दर्जा दिला. नंतर 21 जानेवारी 1972 रोजी मेघालय स्वतंत्र राज्य म्हणून स्थापन करण्यात आले.
भाषा :
मेघालयची मुख्य भाषा इंग्रजी आहे. इतर बोलल्या जाणार्या भाषा म्हणजे खासी, गारो, पनार, बियाट, हाजोंग आणि बांगला किंवा इतर हिंदी भाषा ही काही ठिकाणी बोलली जाते.
लोक व समाजजीवन :
राज्यातील खासी, जैंतिया आणि गारो या प्रमुख आदिवासी जमाती असून, त्यांपैकी खासी आणि जैंतिया यांच्यात बरेच साम्य आढळते. खासी-जैंतिया जमाती मंगोलियन वंशाच्या आहेत. डोंगराळ प्रदेशात फार प्राचीन काळापासून स्थायिक झालेल्या या जमातींचा बाह्य जगाशी फारसा संपर्क आला नाही. त्यामुळे आपली सांस्कृतिक वैशिष्ट्ये आणि प्रथा त्यांना टिकविता आल्या. खासी भाषा ही त्यांची स्वतंत्र भाषा असली, तरी तिला स्वतःची लिपी नाही.
खासी जैंतियातील सिएम्-भोवती या त्यांच्या जमातीचे सर्वांगीण शासन आणि प्रशासन केंद्रित झालेले होते. मातृसत्ताक कुटुंबपद्धती त्यांच्यात रूढ आहे. या लोकांत मांसाहाराचे प्रमाण अधिक आहे. कोंबड्या, डुकरे आणि इतर गुरे ते पाळतात. गुरांचा उपयोग मांसाहारासाठी अधिक करतात. तादंळापासून तयार केलेली ‘बीर’ येथील पुरुषवर्गात विशेष आवडती आहे. अलिकडच्या काळात मात्र इतरही प्रकारचे मद्य सेवन केले जाते.
मेघालयातील प्रमुख नद्या :
मेघालय राज्यातील नद्या पर्वतीय प्रदेशातून व खडकाळ पात्रांमधून वाहत असल्याने त्या द्रुतगती आहेत तसेच त्यांच्या पात्रांमध्ये ठिकठिकाणी धबधबे व द्रुतवाह निर्माण झालेले दिसतात. चेरापुंजी जवळच्या मॉसमाई येथील नोहस्नीगथिआंग धबधबा प्रेक्षणीय आहे.
राज्याच्या गारो हिल्स जिल्ह्यात कृष्णाई (दायरिंग), कालू (जिरा), भुगई (बुगी), निताई (दारेंग) व सोमेश्वरी (सिमसंग) खासी हिल्स जिल्ह्यातून किनशी, ख्री, उमत्र्यू, उमनगॉट उमिआम मावफ्लांग व उमिआम रव्वान, तर जैतिंया हिल्स जिल्ह्यातून कोपिली, म्यिंटडू व ग्यिनटांग या नद्या डोंगराळ प्रदेशातून वाहतात.
व्यवसाय :
मेघालय हे कृषीप्रधान राज्य आहे. यातील 80 टक्के लोकसंख्या आपल्या उदरनिर्वाहासाठी कृषीवर अवलंबून आहे. शेतीला पोषक हवामानामुळे हे राज्य प्रगतीपथावर आहे. उष्ण कटीबंधीय व समशितोष्ण वातावरणात फळे व भाज्यांच्या उत्पादनाला येथे जास्त वाव असतो.
तांदूळ या प्रमुख पिकाखेरीज संत्रे, अननस, केळी, फणस, उष्ण प्रदेशातील फळे, आलूबुखार, पियर, पिसेस इत्यादी फळांचे उत्पादन होते. बटाटे, हळद, आले, काळे मिरे, पोफळी (सुपारी), आखूड धाग्याचा कापूस, ताग, मेष्टा व मोहरी इत्यादी रोख उत्पन्न देणारी पिकेही घेतली जातात. भुईमुग, सोयाबिन, सूर्यफूल यांचे उत्पादनही राज्यात होते.
जंगले व प्राणी :
जास्त पर्जन्यवृष्टीमुळे मेघालयात विस्तृत असे जंगलमय प्रदेश आढळतात. राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी 8,51,000 हेक्टर क्षेत्र अरण्याखाली आहे. पाइन, साग, बांबू हे वनस्पतिप्रकार विपुल प्रमाणात आहेत. त्यांशिवाय बर्च, ओक, बीच, गुरग्रा, हळदू, डालू व कवठी चाफा हे वनस्पती प्रकारही येथील जंगलांत आढळतात.
येथील जंगलमय प्रदेशात हत्ती, वाघ, हरिण, सांबर, सोनेरी मांजर, हूलॉक, रानडुक्कर, रानरेडे, रानगवा, लांडगा, ससा, माकड, शेपटी नसलेले माकड, मुंगीखाऊ प्राणी, खार, साप हे प्राणी तसेच मोर, तितर, कबूतर, हॉर्नबिल, रानबदक, पोपट इ. पक्षी विपुल प्रमाणात पहावयास मिळतात. परंतु पूर्वी जंगली प्राण्यांची संख्या विपुल प्रमाणात होती, मात्र आता कमी झाली.
सण :
‘नोंगक्रेम’ हा खासींचा राष्ट्रीय सण तथा नृत्योत्सव आहे. शिलाँगजवळच्या स्मिनेनामक गावात तो साजरा केला जातो. या नृत्योत्सवासाठी शुभ दिवस जमातप्रमुखांच्या चर्चेने ठरविण्यात येतो. धार्मिक, सामूहिक असे नृत्य केले जाते. मेघालयातील पारंपरित सांस्कृतिक जीवन आणि कलापरंपरा आता बदलत चालल्या आहेत.
नृत्य व संगीत :
नृत्य आणि संगीत हे खासी संस्कृतीचे खास वैशिष्ट्य आहे. गीत-गायन हे सामान्यतः वाद्यवादन आणि नृत्य यांच्याबरोबरच केले जाते. खासी व गारो जमातींची समूहनृत्ये खुल्या मैदानात होतात. खासी स्त्रीपुरुष वेगवेगळ्या रांगा करून नाचतात. ढोल, नगारे आणि पाइप यांसारखी वाद्ये साथीला असतात. विवाहित स्त्रिया नृत्यात भाग घेत नाहीत.
कला :
खासी मूर्तिकलेचे विषय म्हणजे मनुष्य, पशुपक्षी, फुलवेली किंवा जंगली परिसर हे होत. सोनफरजवळच्या गुंफेत देवनागरी लिपीतील कोरीव लेख, तसेच योद्धा, हत्ती आणि घोडेस्वार यांची चित्रे आहेत. जोवई शहराजवळ एका दाम्पत्याची शिल्पाकृती आहे, तीही वैशिष्ट्यपूर्ण आहे.
यांशिवाय हत्ती-घोड्यांच्या मूर्ती आणि रूपासोर येथे दोन भव्य मेंढ्यांच्या मूर्ती आहेत. खासींच्या पारंपरिक चित्रकलेत मृत्पात्री आणि कपड्यावरील वेलबुटींची नक्षी विशेष उल्लेखनीय आहे. नित्योपयोगी अशा अनेक भांड्यांवर चित्रकाम केलेले आढळते. येथील दागदागिने, नृत्यसमयीचे मुगुट यांवरही चित्रविचित्र आकृत्यांचे चित्रण केल्याचे दिसते. मृतांच्या अस्थींवर टाकण्याच्या चादरींवर फूल, छत्री आणि प्राणी यांची चित्रे काढली जात. खासी घरांच्या दरवाज्यांवरही सचित्र रंगकाम केलेले आढळते.
पर्यटन स्थळ :
शिलाँग : शिलाँग हे देवदारच्या झाडांनी व्यापलेले अतिशय सुंदर हिल स्टेशन आहे. ते आपल्या सुंदरता, विरासत, परंपरेसाठी ओळखले जाते. येथील आकर्षक सौंदर्य, आजूबाजूच्या पहाडांमुळे या ठिकाणामुळे ‘पूर्वचं स्कॉटलँड’ म्हणून ओळखले जाते.
शिलाँग हे मेघालय राज्याची राजधानी आहे. शिलाँगमध्ये बरीच पर्यटन स्थळे आहेत. यामुळे हे शहर विशेष बनले आहे. नद्या, प्राणिसंग्रहालय, संग्रहालये, ट्रेक पॉइंट्स, धबधबे आदी पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र .
एलीफेंट फॉल्स : या धबधब्याखाली मोठा खडक आहे. तो अगदी हत्तीप्रमाणे दिसतो. या कारणास्तव या जागेला एलिफंट फॉल्स असे नाव दिले आहे. त्यातून तीन लहान धबधबे निघतात हे विशेष. या ठिकाणाहून येणारा पाण्याचा आवाज तुम्हाला मोहून टाकणार आहे.
डॉन बॉस्को संग्रहालय : आदिवासी संस्कृती आणि मेघालयातील सांस्कृतिक इतिहासाबद्दल जाणून घेण्यासाठी डॉन बॉस्को संग्रहालय उत्तम ठिकाण आहे. संग्रहालयात देशी लिखाण आणि कलाकृतींचा प्रभावी संग्रह आहे.
या संग्रहालयात सात मजले आणि 17 गॅलरी आहेत. येथे तुम्हाला प्रादेशिक कलाकृती, वेशभूषा, हस्तकला आदी मौल्यवान वस्तू दिसतील. डॉन बॉस्को संग्रहालय हे देशातील स्थानिक संस्कृतींचे आशिया खंडातील सर्वांत मोठे संग्रहालय समजले जाते.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.
हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-
Essay On Metro Rail In Marathi
Essay On World Wildlife Day In Marathi
My Country India Essay In Marathi