सरकारी योजना Channel Join Now

कचरा व्यवस्थापन विषयी संपूर्ण माहिती Waste Management Information In Marathi

Waste Management Information In Marathi आजकाल कचरा व्यवस्थापन ही एक मोठी जागतिक समस्या होऊन बसली आहे. वाढत्या लोकसंख्येसोबतच मोठ्या प्रमाणावर कचऱ्याची समस्या डोके वर काढत आहे. आणि यासोबतच कचऱ्याचे मोठे मोठे ढीग वाढत चालले आहेत. त्यातही बरेच लोक कचरा वर्गीकृत न करताच टाकतात, त्यामुळे कचऱ्याचे पुनर्वापर किंवा प्रक्रिया करणे अत्यंत कठीण होऊन जाते.

कचरा व्यवस्थापन विषयी संपूर्ण माहिती Waste Management Information In Marathi

काही महाभाग कोठेही इतस्थ कचरा फेकून देतात, ज्यामुळे सर्वत्र नागरी भागात देखील घाणीचे साम्राज्य वाढत चालले आहे. ह्या वाढत्या कचऱ्याचे नीट व्यवस्थापन जर केले गेले नाही तर येणाऱ्या काळात मानव जातीला अतिशय मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागेल.

या कचऱ्यामुळे अनेक साथीचे रोग निर्माण होण्याची शक्यता निर्माण होते, सोबतच पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या कचऱ्यांमध्ये बुरशी निर्माण होऊन तसेच हा कचरा सडून अनेक विषारी वायू निर्माण होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे हा कचरा नागरी वस्तीलगत गोळा केला असेल तर तेथील नागरिकांना दुर्गंधीला सामोरे जावे लागते.

मित्रांनो, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन केले नाही तर किती मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात याची कल्पना न केलेलीच बरी. आजच्या भागामध्ये आपण योग्य रीतीने कचरा व्यवस्थापित कसा करायचा याबाबत बघणार आहोत…

मित्रांनो कचरा, ऐकायला किती सहज वाटणारा हा शब्द. कारण लहानपणापासून आपण हा शब्द ऐकत/ वाचत/ लिहीत आलेलो आहोत. मात्र कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन याबद्दल आपण कधी विचार केला आहे का? कारण आपल्याकडचा कचरा एकदा गाडीत टाकला की आपली जबाबदारी संपली असंच प्रत्येक नागरिकांचे मत असतं, मात्र तो कचरा तयार करण्यापासूनच त्याच्या वर्गीकरण आणि तो कसा गाडीत टाकावा, अशा अनेक टप्प्यांवर नागरिकाच्या अनेक भूमिका असतात. त्या योग्यपणे वटवल्या गेल्या तर कचऱ्याची समस्या लवकरात लवकर सोडवली जाऊ शकेल.

मध्यंतरीच्या काळात देवनार डम्पिंग ग्राउंडला आग लागली होती, या भीषण आगीचे विश्लेषण केले असता ओला व सुका कचरा वेगळा न करणे हे मोठे महत्त्वाचे कारण समोर आले, त्यामुळे कचऱ्याचे वर्गीकरण किती महत्त्वाचे आहे या गोष्टीने पुन्हा एकदा डोके वर काढले. सर्वात आधी आपण कचऱ्याचे विविध प्रकार बघुयात…

कचऱ्याचे प्रकार:

ओला कचरा: मित्रांनो ज्या कचऱ्याचे विघटन होऊ शकते आणि त्यापासून कंपोस्ट खत बनवली जाऊ शकतात असा कचरा म्हणजे ओला कचरा होय. यामध्ये प्रामुख्याने स्वयंपाक घरातील कचरा, झाडाची पाने, निर्मल्याचा कचरा, लाकडाच्या वखारीतील कचरा, नारळ- शहाळे, मांस आणि हाडे इत्यादींचा समावेश होतो.

सुका कचरा: जो कचरा विघटित होऊ शकत नाही, तसेच त्याचे मोठे चे मोठे ढीग साचतात. यामध्ये शालेय कचरा, कागद, प्लास्टिक खाद्यपदार्थांचे रॅपर्स, धातूंचा कचरा, काच, इलेक्ट्रॉनिक कचरा यांसारख्या गोष्टींचा समावेश होतो.

आरोग्यासाठी घातक कचरा:

यामध्ये प्रामुख्याने दवाखान्यातील कचऱ्याचा समावेश होतो. ज्यामध्ये वापरलेल्या सुया, इंजेक्शने, खराब झालेल्या औषधी, सॅनिटरी डायपर्स, दवाखान्यात वापरला जाणारा कापूस, त्याचबरोबर स्फोट होऊ शकणारे पदार्थ जसे की बॅटरीज, रसायने, ट्यूबलाइट्स, आणि विषारी पदार्थ जसे कीटकनाशके, रसायने, जंतुनाशके इत्यादी कचरा घातक कचऱ्यामध्ये येतो.

कचरा कमी करण्याचे विविध उपाय:

मित्रांनो, कुठल्याही गोष्टीचे मुळावरच घाव घातला की पुढे फार काही गोष्टी करायला लागत नाहीत. या न्यायाने कचरा तयार करतानाच त्यावर उपाय करणे कचरा व्यवस्थापनातील महत्त्वाचे पाऊल ठरते. यामध्ये शून्य कचरा ही कन्सेप्ट खूप प्रचलित झाली आहे, यामध्ये कुठल्याही गोष्टीची विल्हेवाट लावताना पूर्णपणे विचार केला जातो.

येथे जुन्या वस्तू चांगल्या असतील तरी टाकून देऊन नवीन वस्तू घेण्याचे प्रमाण कमी केले जाते. तसेच ज्या गोष्टी खराब झाल्या असतील मात्र दुसऱ्या उपयोगासाठी त्या पुनर्वापर करता येऊ शकतात अशा असतील तर त्या गोष्टी देखील कचऱ्यामध्ये जाण्यापासून वाचविल्या जातात.

कचरा व्यवस्थापनाची दुसरी महत्त्वाची कन्सेप्ट म्हणजे वस्तूंचा वापरच कमी करायचा, ज्यामध्ये गरज नसलेल्या वस्तू खरेदी करण्यावर बंधने घालून घेतली जातात. तसेच कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या न वापरता बाजारात जाताना कापडी पिशवी सोबत घेऊन जाणे हे देखील समाविष्ट होते.

वस्तूंचा पुनर्वापर करणे हे देखील कचरा व्यवस्थापनात महत्वाचे ठरते, यामुळे अधिकचा कचरा निर्माण न होता तो जागेवरच संपवला जातो. यामध्ये दुकानात विविध गोष्टींसोबत मिळणाऱ्या बाटल्या, डब्बे, कागद, पिशव्या इत्यादी गोष्टी धुवून पुन्हा पुन्हा वापरणे याचा समावेश होतो. तसेच एकच बाजूने वापरलेल्या कागदांची दुसरी बाजू वापरणे,   प्लास्टिक पिशव्यांचे तुकडे करण्याऐवजी त्यामध्ये  विविध गोष्टी भरून ठेवणे या गोष्टी करता येण्यासारख्या आहेत.

कचरा व्यवस्थापनातील शेवटची आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पुनर्निर्मिती होय. यामध्ये वापरलेल्या गोष्टी इतर प्रकारच्या कचऱ्यापासून सेपरेट ठेवल्यास आणि फक्त सारख्या प्रकारच्या गोष्टीसोबतच ठेवल्यास पुनर्निर्मिती शक्य होते. यातील काच कचरा वितळून पुन्हा त्यापासून काच बनवता येते. याच पद्धतीने धातू, प्लास्टिक, कागद, इत्यादी गोष्टी सुद्धा पुन्हा नव्याने बनवल्या जाऊ शकतात. तसेच विविध पदार्थांचे सॅशे, खाद्यपदार्थांचे छोटे प्लास्टिक वेष्टने इत्यादी गोष्टीही पुनर्निर्मित केले जाऊ शकतात.

कचरा नष्ट करण्याच्या पद्धती:

मित्रानो, कितीही कचरा कमी करण्याचा प्रयत्न केला तरी देखील कचरा तयार होणारच आहे, हा तयार झालेला कचरा योग्यरितीने नष्ट करणे देखील तेव्हढेच महत्वाचे आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या कचऱ्यानुसार नष्ट करण्याचा वेगवेगळ्या पद्धती असतात, ज्यामध्ये जाळणे, पुरने, पुनर्निर्मितीक्षम कचरा विकणे किंवा लिलाव करणे, ओल्या कचऱ्याचे कंपोस्ट बनवणे, बांधकामाचा कचरा भर म्हणून वापरणे इत्यादींचा समावेश होतो.

निष्कर्ष:

मित्रांनो, आज आपण कचरा व्यवस्थापन या विषयावर माहिती पाहिली. या सर्व माहितीवरून तुमच्या एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली असेल आणि ती म्हणजे कोणाच्याही लक्षात येत नसली तरी देखील कचरा व्यवस्थापन ही एक खूप मोठी समस्या आहे. भारतासारख्या जास्त आणि वाढत्या लोकसंख्येच्या देशापुढे तर ही समस्या खुपच जटिल बनत चालली आहे. या समस्येवर वेळीच तोडगा काढला नाही, तर एका मर्यादेनंतर ही समस्या कोणीच हाताळू शकणार नाही.

या सर्वांसाठी शासनाने कठोर भूमिका घेत आजपासूनच कचरा व्यवस्थितपणे व्यवस्थापित केला पाहिजे, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे नागरिकांनी देखील आपली सामाजिक जबाबदारी लक्षात घेत कमीत कमी कचरा निर्माण करणे, कचरा व्यवस्थीत पणे वर्गीकरण करून देणे, ओल्या कचऱ्यापासून घरीच कंपोस्ट खत बनवणे, शक्य त्या गोष्टी पुनर्वापर करणे, इत्यादी गोष्टीतून या कार्यात हातभार लावणे आवश्यक आहे.

FAQ

कचरा व्यवस्थापन म्हणजे काय?

कचऱ्याची योग्य वर्गीकरणासह निसर्गाला हानी न पोहोचवता विल्हेवाट लावणे म्हणजे कचरा व्यवस्थापन होय.

ओला आणि सुका कचरा का वर्गीकृत करतात?

ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत तर सुक्या कचऱ्याचे पुनर्वापर किंवा प्रक्रिया केली जाते. हा दोन्ही प्रकारचा कचरा एकत्र असेल तर या प्रक्रियांमध्ये अडथळा निर्माण होतो म्हणून ओला व सुका कचरा वेगळा केला जातो.

ओल्या कचऱ्यामध्ये कशाचा समावेश होतो?

ओल्या कचऱ्यामध्ये भाज्यांचे देठ, झाडाची पाने, खरकटे अन्न इत्यादी गोष्टींचा समावेश होतो.

उकिरडा कशाचा प्रकार आहे?

उकिरडा हा ओल्या कचरा व्यवस्थापनाचा प्रकार आहे.

कचऱ्यापासून बायोगॅस बनवला जाऊ शकतो का?

हो, नक्कीच, हल्लीच असा घन कचऱ्यापासून बायोगॅस बनवण्याचा प्रकल्प पुणे महानगर पालिकेने केला आहे.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण कचरा व्यवस्थापनावर आधारित माहितीचा भाग पाहिला, यावरील तुमच्या प्रतिक्रिया तर तुम्ही आमच्याकडे पोहोचवताच, मात्र या विषयात तुम्हाला काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये विचारा, या सर्व प्रश्नांचे आमच्याकडून किंवा तज्ञ वाचकांकडून नक्कीच निरसन केले जाईल.

धन्यवाद.

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment