Ratnagiri District Information In Marathi महाराष्ट्र राज्यातील जे अविकसित जिल्हे आहेत, त्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश होतो. हा मागासलेपणा घालविण्यासाठी महाराष्ट्र व केंद्र शासनांनी अनेक योजना कार्यान्वित केल्या आहेत.तर चला मग पाहूया रत्नागिरी या जिल्ह्याविषयी सविस्तर माहिती.
रत्नागिरी जिल्ह्याची संपूर्ण माहिती Ratnagiri District Information In Marathi
रत्नागिरीचा संबंध महाभारत काळाशीही आहे. असे म्हटले जाते की पांडवांनी आपल्या वनवासातील तेरावे वर्ष रत्नागिरीला लागून असलेल्या भागात घालवले. म्यानमारचे शेवटचे राजा थिबू आणि विनायक दामोदर सावरकर रत्नागिरीतच कैद झाले. असा इतिहास रत्नागिरी जिल्ह्याला लागू आहे.
क्षेत्रफळ व विस्तार :
रत्नागिरी जिल्ह्याचे क्षेत्रफळ 8,249 चौ. किमी. असून अक्षवृत्तीय विस्तार 16030′ ते 1804′ उत्तर व रेखावृत्तीय विस्तार 7304′ ते 73052′ पूर्व रेखांश यांदरम्यान आहे. जिल्ह्याची उत्तर-दक्षिण लांबी 180 किमी. असून पूर्व-पश्चिम विस्तार सरासरी 64 किमी. आहे. रत्नागिरी जिल्ह्याची उत्तरेला रायगड जिल्हा, पूर्वेला सह्याद्री पर्वताच्या रांगा व त्याचप्रमाणे सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्हे, दक्षिणेला सिंधुदुर्ग जिल्हा, पश्चिमेला अरबी समुद्र आहे.
हवामान :
रत्नागिरी जिल्ह्यातील हवामान उष्ण, दमट व सम प्रकारचे असते. मे महिना सर्वाधिक तापमानाचा, तर जानेवारी महिना किमान तापमानाचा असतो. मोसमी हवामान असल्याने जिल्ह्यात तीन ऋतू स्पष्टपणे दिसून येतात. हिवाळ्यातील दैनिक सरासरी कमाल तापमान 28° से. व किमान तापमान 20° से., तर उन्हाळ्यातील दैनिक सरासरी कमाल तापमान 30° से. ते 33° से. व किमान तापमान 21° ते 26° असते.
उंचीमुळे सह्याद्रिपट्टीतील हवामान थंड असते. जून महिन्यात पावसाला सुरुवात झाल्यानंतर तापमानाची तीव्रता कमी होते. जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर हे चार महिने पावसाळा ऋतू असून या कालावधीत नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. जिल्ह्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान 330 सेंमी. आहे.
भूवर्णन :
रत्नागिरी जिल्ह्याचे तीन विभागात विभाजन करण्यात आले आहे. 1) सह्याद्री, 2) वलाटी किंवा पठारी प्रदेश, 3) खलाटी किंवा किनारपट्टीचा प्रदेश. रत्नागिरी जिल्ह्याच्या पूर्वेस सह्याद्रीच्या रांगा असून हा संपूर्ण प्रदेश चढउतारांनी युक्त्त आहे. डोंगराळ प्रदेशाने जिल्ह्याची 85% भूमी व्यापलेली आहे.
सह्याद्रीच्या मुख्य रांगेत उंच व दुर्गम कडे आहेत. पर्वतरांगांदरम्यानच्या भागात खोल दऱ्या आहेत. दऱ्याखोऱ्यांच्या दक्षिणोत्तर लांबचलांब पसरलेल्या या पट्ट्यालाच ‘सह्याद्री पट्टा’ किंवा ‘बांद्री पट्टा’ असे म्हणतात.
सह्याद्रीच्या उंच शिखरांवर पूर्वी बांधलेले महिपतगड, सुभानगड, भैरवगड, प्रचितगड यांसारखे गड आहेत. प्रदेशाचा उतार पूर्वेकडून पश्चिमेकडे आहे. डोंगराळ प्रदेशाच्या पायथ्याशी जो काहीसा सपाट व पठारी भाग दिसतो, त्यालाच ‘वलाटी’ असे म्हणतात. या पट्टीत काळी व तांबडी जमीन तसेच जांभा व बेसाल्ट प्रकारचे खडक आहेत.
प्रमुख नद्या :
रत्नागिरी जिल्ह्यात शास्त्री, वाशिष्ठी, अंबा, जगबुडी, नळकडी, मुचकुंदी, जोग, काजळी व शुक प्रमुख नद्या आहेत. सर्व नद्या सह्याद्रीच्या मुख्य पर्वतरांगेत उगम पावून पश्चिमेला अरबी समुद्राला जाऊन मिळतात. सह्याद्रीच्या डोंगराळ भागात तीव्र उतारामुळे नद्या वेगाने वाहतात.
पुढे वलाटी व खलाटीच्या प्रदेशांत त्यांना इतर प्रवाह मिळून त्यांचा आकार वाढतो. जिल्ह्यातील नद्यांना पावसाळ्यात पूर येतात, तर उन्हाळ्यात बहुतेक नद्या कोरड्या पडतात. फक्त्त वाशिष्ठी नदीला बारमाही पाणी असते, कारण सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या पाण्यावर पोफळी येथे वीज तयार केल्यानंतर ते पाणी पुढे वाशिष्ठी नदीत सोडले जाते.
तालुके :
रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी, संगमेश्वर, लांजे व राजापूर असे एकूण नऊ तालुके आहेत. रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा मिळून पूर्वी रत्नागिरी हा 15 तालुक्यांचा एकच जिल्हा होता परंतु 1 मे 1981 पासून रत्नागिरी जिल्ह्याचे रत्नागिरी व सिंधुदुर्ग अशा दोन जिल्ह्यांत विभाजन करण्यात आले.
खनिज संपत्ती :
रत्नागिरी जिल्ह्यात बॉक्साइट, चिनी माती, डोलोमाइट, मँगॅनीज, सिलिका, क्रोमाइट व इल्मेनाइट हे खनिज पदार्थ मिळतात. जिल्ह्यात जांभा दगड मोठ्या प्रमाणावर सापडतो. काळीथर हा दगड डोंगराळ प्रदेशात मोठ्या प्रमाणावर सापडत असून, त्या दगडापासून मोठमोठे खांब व खडी तयार केली जाते. त्याशिवाय कुरुंदाचा दगडही येथे मिळतो.
मालगुंड, तिवरे, पूर्णगड या भागांत इल्मेनाइट खनिज मिळते. राजापूर तालुक्यातील वाटुळ या गावाच्या आसपास सिलिकायुक्त्त वाळू अधिक मिळते. दापोली, मंडणगड या तालुक्यांतून बॉक्साइट मिळते. राजापूर, दापोली व चिपळूण तालुक्यांत चिकणमाती मिळते.
वनस्पती व प्राणी :
रत्नागिरी जिल्ह्याच्या सह्याद्रिपट्टीत मंडणगड, खेड, चिपळूण, संगमेश्वर, लांजे, राजापूर या तालुक्यांत जंगलांचे प्रमाण जास्त आहे. सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर उष्णकटिबंधीय सदाहरित अरण्ये आहेत. त्याच्या पश्चिमेला पानझडी वृक्ष दिसून येतात. जंगलांमध्ये साग, शिसव, नाणा, किंजळ, शिवण, हिरडा, खैर इ. महत्त्वाच्या वृक्षांच्या जाती आहेत.
जंगलांतून लाकडाचे उत्पादन मिळविले जाते. त्याशिवाय मध, मेण, डिंक, कात, लाख, रंग, औषधी वनस्पती, कातडी कमावण्यासाठी लागणारे पदार्थ अशी दुय्यम उत्पादनेही जंगलांतून मिळतात. अलीकडे रबराच्या झाडांची लागवडही करण्यात आलेली आहे. जंगलांत वाघ, लांडगा, सांबर, रानडुक्कर, ससा, कोल्हा, हरिण इ. प्राणी दिसून येतात.
शेती व्यवसाय :
शेती हा या जिल्ह्यातील लोकांचा प्रमुख व्यवसाय असून सु. 70% लोकसंख्या याच व्यवसायावर अवलंबून आहे. फळबागा व मच्छिमारी या दोन व्यवसायांना जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे स्थान आहे. भात हे जिल्ह्यातील प्रमुख पीक असून हलक्या जमिनींमध्ये नाचणी, वरी, तीळ इ. खरीप पिके घेतली जातात.
रत्नागिरी-24, जया, सोना, पंकज अशा भाताच्या अधिक उत्पादन देणाऱ्या संकरित जातीही लावल्या जातात. यांशिवाय कोळंबा, पटणी, भडस, वरंगळ या प्रकारच्या भातांचीही लागवड केली जाते. भातापासून पोहे व चुरमुरे तयार करण्याचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो.
रब्बी हंगामात वाल, कुळीथ, मूग, पावटा, उडीद, चवळी यांसारखी पिके घेतली जातात. थोडीबहुत मिरचीची लागवड केली जाते. आंबा, फणस, काजू, रातांबे, नारळ, सुपारी इ. जिल्ह्यातील प्रमुख नगदी पिके आहेत. येथील हापूस आंबा प्रसिद्ध असून तो परदेशांतही पाठवला जातो.
इतर व्यवसाय :
नारळाच्या खोबऱ्यापासून तेल काढणे, नारळ व नारळाच्या झाडापासून काथ्या, ब्रश, दोरखंडे, पायपुसणी, पिशव्या, केरसुण्या इ. वेगवेगळ्या उपयुक्त वस्तू तसेच शोभेच्या वस्तू बनविण्याचे व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतात. फणस हे तर जिल्ह्याचे वैशिष्ट्यच आहे.
फणसाचे गरे वाळविणे, फणस पोळी तयार करणे हे त्यांवर आधारित व्यवसाय चालतात. येथील काजूला परदेशांतही मोठी मागणी असते. काजूचे गर काढणे, ते हवाबंद डब्यात भरणे, बाजारपेठेत पाठविणे हे व्यवसाय मुख्यतः रत्नागिरी तालुक्यात शिरगाव व खेडशी येथे अधिक चालतात.
वाहतूक व्यवस्था :
रत्नागिरी जिल्ह्यात लोहमार्ग नाहीत. जिल्ह्याच्या औद्योगिकीकरणातील ही महत्त्वाची समस्या आहे. मुंबई-कोकण-गोवा हा 17 क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग जिल्ह्यातून जातो. जिल्ह्यात एकूण 2,966 किमी. लांबीचे पक्के रस्ते आहेत. त्यांपैकी सिमेंट काँक्रीट व डांबराचे 1,208 किमी. व खडीचे रस्ते 1,758 किमी. आहेत. कच्च्या रस्त्यांची एकूण लांबी 1,425 किमी. होती.
पर्यटन स्थळ :
जिल्ह्यातील बरीच पर्यटन स्थळ आहे तेथे दरवर्षी पर्यटक भेट देत असतात. जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक किल्ले असून त्यांपैकी रत्नागिरीजवळील रत्नदुर्ग, जयगड व पूर्णगड, चिपळूण तालुक्यातील गोवळकोट, दापोली तालुक्यातील दाभोळच्या खाडीजवळील गोपाळगड व हर्णै येथील समुद्रात एका खडकाळ बेटावर बांधलेला सुवर्णदुर्ग, खेड तालुक्यातील पालगड, महिपतगड, रसाळगड, सुमारगड इ. किल्ले उल्लेखनीय आहेत.
चिपळूण जवळील परशुराम मंदिर, राजापूरजवळील धूतपापेश्वर, देवरुखजवळील मारळेश्वर, रत्नागिरीजवळील गणपतिपुळे, संगमेश्वरजवळील कर्णेश्वर ही प्रसिद्ध देवस्थाने आहेत. गणपतिपुळे हे पर्यटन केंद्र म्हणूनही प्रसिद्ध आहे. संगमेश्वरजवळच संभाजी महाराजांना मोगलांनी पकडले होते. तेथे संभाजी महाराजांचे एक स्मारक उभारण्याची योजना आहे.
पावस येथे स्वामी स्वरूपानंद यांची समाधी आहे. राजापूर, संगमेश्वर तालुक्यातील राजवाडी, आरवले, दापोली तालुक्यातील उन्हावरे येथे गरम पाण्याचे झरे आहेत.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करू नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.