Pune District Information In Marathi पुणे या शहराला ‘विद्येचे माहेरघर’ असे म्हटले जाते. ते उगाचच नाही तर पुणे शहरातील पुणे विद्यापीठ हे जगप्रसिद्ध असून पुण्यास “पूर्वेचे ऑक्सफर्ड” असेही म्हणतात. त्याचबरोबर गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था, डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था ही स्वायत्त विद्यापीठे आहेत. तर चला मग पाहूया पुणे या जिल्हा विषयी सविस्तर माहिती.
पुणे जिल्ह्याची संपूर्ण माहिती Pune District Information In Marathi
पुणे विद्यापीठाचे नामकरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ केले आहे. बरेचसे क्रांतिकारक तसेच स्वातंत्र्य सेनानी येथे जन्माला आले. कित्येक चळवळी येथे जन्माला आल्या. येथे थोर संत जन्मले. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांची जन्म ठिकाण पुणे जिल्ह्यातील अनुक्रमे जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्यावर व पुरंदर किल्ल्यावर झाला.
क्षेत्रफळ व विस्तार :
पुणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ 15,640 चौ. किमी असून पुणे जिल्हयाचा अक्षवृत्तीय विस्तार 17° 54′ ते 10° 24′ उत्तर अक्षवृत्तांच्या दरम्यान आहे आणि रेखावृत्तीय विस्तार 73° 19′ ते 75° 10′ पुर्व रेखावृत्तापर्यत आहे तर पश्चिमेस कुलाबा, वायव्येस ठाणे, उत्तरेस व पूर्वेस अहमदनगर, आग्नेयीस सोलापूर व दक्षिणेस सातारा हे जिल्हे आहेत.
लोकसंख्या :
सन 2011 च्या जनगणनेनुसार पुणे जिल्ह्याची लोकसंख्या 94,26,959 इतकी आहे. मराठी ही पुण्याची मुख्य भाषा असली तरी तिथली कॉस्मोपॉलिटन लोकसंख्या इंग्रजी, हिंदी आणि गुजराती यांसारख्या इतर अनेक भाषा बोलतात.
हवामान :
पुणे जिल्ह्यात मे महिन्यात कमाल तापमान 41° से.पर्यंत वाढते आणि जानेवारीत ते किमान 5.6° से.पर्यंत खाली जाते. उन्हाळ्यात वारे मुख्यतः वायव्य आणि पश्चिम दिशांकडून वाहतात व पावसाळ्यात ते नर्ऋत्य किंवा पश्चिमेकडून, तर हिवाळ्यात सामान्यतः ईशान्य किंवा पूर्वेकडून वाहतात. दक्षिणेकडून येणारे वारे आढळत नाहीत.
नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांपासून जून ते सप्टेंबर अखेर पडणाऱ्या पावसाची सरासरी जास्त असते. सह्याद्रीमुळे घाटमाथ्यावर भरपूर पाऊस पडतो. त्याच्या पूर्वेकडील पर्जन्यछायेच्या प्रदेशात मात्र पावसाचे प्रमाण कमी होत जाते. पुणे शहराच्या पश्चिमेस 65 किमी. अंतरावरील लोणावळा येथे सरासरी पाऊस 431 सेंमी. पडतो.
पुणे जिल्ह्यातील तालुके :
पुणे जिल्ह्यात एकूण 14 तालुके आहेत. पुणे शहर, इंदापूर, बारामती, दौंड, भोर, पुरंदर, वेले (वेल्हे), खेड, शिरूर, जुन्नर, आंबेगाव, मावळ, मुळशी आणि हवेली.
पुणे जिल्ह्याचा इतिहास :
पुणे हे नाव पुण्यनगरी या नावावरून पडले असे मानले जाते. हे शहर आहे आठव्या शतकात ते ‘पुन्नक’ या नावाने ओळखले जात असे, असा संदर्भ सापडतो. 11व्या शतकात हे शहर ‘पुणे’ किंवा ‘पुनवडी’ म्हणून ओळखले जाऊ लागले. मराठा साम्राज्याच्या काळात या शहराचे नाव ‘पुणे’ म्हणून वापरले जाऊ लागले. इंग्रज त्यांना ‘पूना’ म्हणून संबोधू लागले. आता ते पुणे या अधिकृत नावाने ओळखले जाते.
इसवी सनाच्या 2 शतकात पुणे शहराचा उल्लेख आढळतो. या शहराची पूर्वीची अनेक नावे इतिहासात आढळतात. जसे की पुन्नाटा, पुनवडी, पुण्य याचेच नंतर पुणे अशी उत्पत्ती झाली असावी असा तर्क मांडला जातो. अखिल विश्वासाठी पसायदान मागणाऱ्या व श्रीकृष्णाने सांगितलेली गीता प्राकृत भाषेत सोपी करुन सांगणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलींची संजीवन समाधी पुणे जिल्ह्यात आहे.
साध्या सरळ मराठी माणसाला अध्यात्म आणि जीवनविषयक तत्वज्ञान गाथेतील अभंगाच्या माध्यमातून सांगणाऱ्या संत तुकारामांची पुणे जिल्हा हीच जन्मभूमी व कर्मभूमी होती.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. शिवाजी राजांच्या काळापासून पुण्याचे स्थान महाराष्ट्रात नेहमीच महत्त्वाचे राहीले आहे. केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा देणाऱ्या अनेक संस्थांची व व्यक्तींची खाण म्हणजे पुणे होय. म्हणूनच पुणे तेथे काय उणे अशी म्हण प्रचलित झाली आहे.
पुणे जिल्ह्यातील प्रमुख नद्या :
जिल्ह्यातील एकही तालुका असा नाही, की ज्यातून लहान-मोठी नदी वाहत नाही. बहुतेक सर्व नद्या पश्चिमेकडील सह्याद्री पर्वतात उगम पावून पूर्व किंवा आग्नेय दिशेने वाहतात. भीमा, मीना, कुकडी, वेल, घोड, पुष्पावती, इंद्रायणी, मुळा, मुठा, पवना, नीरा या जिल्ह्यातील प्रमुख नद्या होत. भीमा ही जिल्ह्यातील मुख्य नदी भीमाशंकर येथे उगम पावून आग्नेय दिशेने वाहते.
पुणे जिह्यातील धरणे :
खडकवासला, पानशेत, भुशी, मुुळशी, भाटघर, पिंपळगाव-जोग, वरसगाव, टेमघर, भामा-आसखेड, येडगाव, चास-कमान, माणिकडोह, ठोकरवाडी, नाझरे, आंध्रा-vally गुंजवणी, निरा-देवधर, उजनी,वळवण.
समाज जीवन :
पुणे जिल्ह्यात शासनाने जाहीर केलेल्या एकूण 24 अनुसूचित जाती व 21 जमाती जिल्ह्यात आहेत. अनुसूचित जातींपैकी मांग लोकांची संख्या जास्त असून त्यांखालोखाल चांभार व महार आहेत. अनुसूचित जमातींपैकी महादेव कोळी, कातकरी व ठाकूर या जमाती प्रमुख आहेत.
मुळशी, भोर व वेल्हे तालुक्यांत कातकरी आंबेगाव, मावळ, खेड व जुन्नर तालुक्यांत महादेव कोळी आणि ठाकूर यांची संख्या जास्त आढळते. ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांपैकी बहुतेकांचा शेती हाच व्यवसाय आहे. डोक्यावर रुमाल किंवा टोपी, अंगात पैरण, धोतर, पायात जाड वहाणा व खांद्यावर उपरणे असा त्यांचा पोशाख असतो.
रोजच्या जेवणात ज्वारीची भाकरी, थोडा भात, कांदा व मिरची यांचा प्रामुख्याने अंतर्भाव असतो. शहरी लोकांच्या पेहरावात मात्र पाश्चात्य पद्धतीचे अनुकरण बरेच दिसते. जिल्ह्यात पोळा, दिवाळी हे सण व गणेशोत्सव, शिवजयंती हे उत्सव थाटामाटाने साजरे होतात.
पुणे शहरातील गणेशोत्सव व शिवजयंती उत्सव विशेष प्रसिद्ध आहेत. यांशिवाय देहू, आळंदी, जेजुरी, करंजेे येथील नित्यनैमित्तिक यात्रांतही लोक उत्साहेने भाग घेतात.
शेती व्यवसाय व उद्योग :
जिल्हाच्या अर्थव्यवस्थेत शेतीला महत्त्वाचे स्थान आहे. जिल्ह्याचा पश्चिम भाग हा जास्त पावसाचा आहे. या भागात तांदूळ हे प्रमुख पीक आहे. या भागात आंबेमोहोर, कमोद इत्यादी तांदळाच्या जाती प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात ज्वारी व बाजरी ही पिके सर्वत्र घेतली जातात.
गहू हे पूर्वेकडील भागात महत्त्वाचे पीक आहे. दौंड व शिरूर तालुक्यात संत्री व मोसंबीच्या बागा आहेत. पुरंदर तालुक्यात अंजीर व सीताफळाच्या बागा आहेत. जुन्नर, हवेली, दौंड इत्यादी तालुक्यात फुलांची शेती केली जाते.
याशिवाय जिल्ह्यात आंबा, डाळिंब, केळी इत्यादी फळांचे उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरण (MIDC) या संस्था जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहेत. पुण्यात अनेक माहिती-तंत्रज्ञान कंपन्या आहेत.
वनस्पती व प्राणी :
जिल्ह्यात प्रामुख्याने तीन प्रकारची जंगले आढळतात :
1) सदाहरित जंगले : ज्यामध्ये साग, जांभूळ, खैर, हिरडा, ऐन इ. महत्त्वाची आहेत.
2) पानझडी वृक्षांची जंगले : ही जंगले बऱ्याच भागांत विखुरलेली असून, त्यांत सावर, धावडा, ऐन, आंबा इ. प्रकार आढळतात.
3) खुरट्या वनस्पती : जिल्ह्याच्या अवर्षणग्रस्त प्रदेशात ह्या वनस्पती असून त्यांत बोर, बाभूळ, लिंब इ. प्रकार आढळतात. जुन्नर, भोर, वेल्हे व पुरंदर तालुक्यांत साग खेड व आंबेगाव तालुक्यांत हिरडा मावळ व मुळशी या तालुक्यांत बांबू, शिकेकाई यांचे प्रमाण अधिक आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागात पूर्वी वाघ, रानडुक्कर, अस्वल, चितळ, भुंकणारे हरिण इ. प्राणी विपुल होते परंतु बेसुमार जंगलतोड व शिकार यांमुळे त्यांचे प्रमाण कमी झाले आहे. जंगलांमधून लांडगा, कोल्हा, तरस, सांबर, नीलगाय, ससा इ. प्राणी आढळतात. यांशिवाय खोकड, रानमांजर, मुंगूस, सायाळ इ. प्राणीही पुष्कळ आहेत.
पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळ :
पुणे शहरातील गणेशोत्सव विशेष प्रसिद्ध आहे. चाकण येथे भुईकोट किल्ला, आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी, देहू येथे संत तुकाराम महाराजांची जन्म व कर्मभूमी आहे. मोरगाव, रांजणगाव, ओझर, थेऊर, लेण्याद्री ही अष्टविनायकातील पाच ठिकाणे याच जिल्ह्यात आहेत.
जिल्ह्यात लोणावळा, खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे प्रसिद्ध आहेत. शिवनेरी, सिंहगड, तोरणा, राजगड, पुरंदर, लोहगड, विसापूर इत्यादी किल्लेही पर्यटनासाठी विशेष प्रसिद्ध आहेत. भीमाशंकर येथील शंकराचे मंदिर आहे. येथे भीमा नदीचे उगमस्थान व अभयारण्य आहे. येथे दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत असतात.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.