Mexico Information In Marathi मेक्सिकोमध्ये निसर्ग सौंदर्य तसेच विविध संस्कृतीची स्मारके, आधुनिकता आपल्याला पहायला मिळतात. त्यामुळे मेक्सिको हा देश पर्यटकांसाठीही तेवढाच महत्वाचा आहे. तर चला मग या देशाविषयी आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

मेक्सिको देशाची संपूर्ण माहिती Mexico Information In Marathi
मेक्सिको येथे ज्वालामुखीजन्य पर्वताची शिखरे, उंच गिरीस्थाने, खोल दऱ्या, वेधक पुळणी, प्राचीन संस्कृतींचे भव्य अवशेष व वाढती आधुनिक नगरे पर्यटकांना आकर्षित करतात.
क्षेत्रफळ विस्तार :
उत्तर अमेरिकेतील सर्वात दक्षिणेकडील हा देश असून बाजूच्या वस्ती असलेल्या बेटांसह याचे क्षेत्रफळ 19,58,201 चौ. किमी. असून 14°32′ उ. से. 32°43′ उत्तर अक्षांश व 86°42′ प. ते 118° 22′ प. रेखांश यांदरम्यान, वायव्य व आग्नेय दिशेने विस्तारलेल्या या देशाच्या उत्तरेस अमेरिकेची संयुक्त संस्थाने, तर आग्नेयेस बेलीस व ग्वातेमाला हे देश असून, पूर्वेस मेक्सिकोचे आखात व कॅरिबियन समुद्र, तर पश्चिमेस व दक्षिणेस पॅसिफिक महासागर आहे. कर्कवृत्त देशाच्या मध्यातून जाते.
चलन :
मेक्सिको या देशाचे चलन पेसो हे आहे.
हवामान :
येथील हवामानात भिन्नता असल्यामुळे येथील तापमान एकसारखे नसते. सरासरी तापमान 25° ते 27° से. असते. हिवाळ्यात ते कमीतकमी 16° से., तर उन्हाळ्यात जास्तीतजास्त 49° से. पर्यंत जाते. मध्यभागातील डोंगराळ प्रदेशात त्यामानाने हवामान थंड असते.
हिवाळ्यात बऱ्याच वेळा डोंगरमाथे बर्फाच्छादित असतात. मेक्सिकोच्या उत्तर भागात पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. दोन्ही किनारी प्रदेशांत वार्षिक सरासरी 99 ते 300 सेंमी. पाऊस पडतो, तर दक्षिणेकडील ताबास्को व चीआपास राज्यांत 500 सेंमी. पर्यंत पाऊस पडतो. बहुतेक पर्जन्य उन्हाळ्यात पडतो.
इतिहास :
मेक्सिको या देशाचा प्राचीन इतिहास खूप जुना आहे. मेक्सिकोतील आद्य रहिवासी सु. 50 हजार वर्षांपूर्वी आशिया खंडातून तेथे गेले असावेत. 1940 नंतर आढळलेल्या पुरावशेषांत प्रागैतिहासिक काळातील प्रचंड प्राण्यांचे, तसेच मानवी अस्थींचे आणि दगडी हत्यारांचे पुरावे मिळाले आहेत.
10,000 वर्षांपूर्वीच्या टेपेस्पान मानवाचे हे वसतिस्थान असावे. इ.स.पू. पाचव्या सहस्त्रकात या भागात शेतीला प्रारंभ झाल्याचे दिसते. येथील प्राचीन मृत्पात्री अवशेष इ.स.पू. 2,000 वर्षांपूर्वीचे आहेत. इ.स.पू. 1500 च्या सुमारास ग्रामीण कृषी संस्कृती या भागात स्थिर झाल्याचे दिसते. मेक्सिकोच्या खोऱ्यातील सरोवरांच्या प्रदेशात ही संस्कृती वाढली.
लाकडी फळ्यांच्या वाफ्यात सरोवरातील सुपीक गाळ टाकून सरोवरातच तरंगत्या बागा उठवल्या जात. तत्कालीन कृषिसंस्कृतीला अनुरूप अशा सूर्य आणि पर्जन्य देवतांच्या कल्पनाही या काळातच उदयास आल्या.
यामुळे धर्मगुरूंचा एक प्रभावी वर्गच समाजात निर्माण झाला. देवतांची प्रचंड अशी मंदिरे व वास्तू उभारण्यास सुरुवात झाली. त्यांच्या परिसरात नगरेही उदयास आली.
वनस्पती व प्राणी :
मेस्किकोच्या किनारी भागातील मैदाने उष्ण प्रदेशीय वनस्पतिनी व्यापलेली असून पठारी प्रदेशाच्या उतारांवर उपोष्ण प्रदेशीय वनस्पती दिसतात. देशाच्या उत्तर भागात वाळवंटी प्रदेशातील निवडुंगासारखे वनस्पती आहेत, तर डोंगर उतारांच्या मिश्रवनस्पतींच्या प्रदेशात प्रामुख्याने सूचिपर्णी वृक्ष आढळतात.
येथील जंगलांत आर्मडिलो, टॅपिर, ऑपॉस्सम, प्यूमा, जॅगुआर, विविध प्रकारची अस्वले व माकडे, हरणे, रानडुक्करे हे वन्यप्राणी दिसून येतात. तसेच तिथे विषारी सर्प व कीटकही बरेच आहेत.
शेती व्यवसाय :
मका हे प्रमुख पीक असून त्याखालोखाल कडधान्ये व गहू ही पिके येतात. यांशिवाय कापूस, ऊस, वाटाणे, कॉफी, भाजीपाला ही नगदी पिके देशात होतात. संत्री, लिंबे, केळी, अननस, द्राक्षे सफरचंद, आंबे फळांचेही उत्पादन घेतले जाते.
कॉफी आणि साखर यांची निर्यात केली जाते. देशातंर्गत साखरेचे सेवन फार मोठे आहे. देशातील लाकूड उत्पादन आणि मत्स्योत्पादन महत्त्वाचे आहे. सार्डीन, कोळंबी, शार्क विविध प्रकारचे मासे येथे सापडतात.
उद्योग :
देशाच्या औद्योगिक क्षेत्रात कारखानदारी, कृषिउद्योग, खाणकाम, खनिज तेल रसायन उद्योग, बांधकाम उद्योग आणि सर्वसामान्य सेवा उद्योग असे उद्योग आहेत. त्यांपैकी मोटारगाड्या, पोलाद, खनिज तेल रसायन उत्पादने आणि खते हे अत्यंत विकसित असे राष्ट्रीय उद्योग आहेत.
पर्यटन हा अत्यंत महत्त्वाचा आणि विकसित उद्योग आहे. देशाच्या निर्यातीत मुख्यतः अशुद्ध खनिज तेल, कॉफी व मोटारगाड्या तर आयातीत मका, कडधान्ये, वाहतुकीची साधने, यांत्रिक उपकरणे यांचा समावेश आहे. देशाचा आंतरराष्ट्रीय व्यापार मुख्यतः अमेरिका, फ्रान्स, प. जर्मनी, ग्रेट ब्रिटन या देशांशी चालतो.
वाहतूक :
देशात रस्ते वाहतूक असून सडकांची लांबी 2,14,073 २ किमी. पॅन अमेरिकन हायवेसह असून 15,667 किमी. लांबीचे लोहमार्ग होते. 1984 मध्ये होते. रेल्वेचे 1937 साली राष्ट्रीयीकरण करण्यात आले. मेक्सिको सिटीमधील भुयारी रेल्वेमार्ग ७८ किमी. लांबीचा आहे. देशात एकूण 32 आंतरराष्ट्रीय व 40 देशांतर्गत विमानतळ आहेत.
देशातील हवाई वाहतूक सर्वोत्कृष्ट मानली जाते. देशात 49 सागरी बंदरे असून तेथून देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय जलवाहतुकीच्या सर्व सुविधा आढळतात. मालाची वाहतूक आणि प्रवासी सेवा यांसाठी जलमार्गांचा मोठाच उपयोग होतो. देशात दूरध्वनी आणि तारायंत्र सेवा उपलब्ध असून ती शासनाच्या अखत्यारीत आहे.
भाषा व साहित्य :
मेक्सिकन साहित्य हे स्पॅनिश भाषेतील एक वैशिष्ट्यपूर्ण साहित्य मानले जाते. विसाव्या शतकात देशातील मुद्रण व प्रकाशन व्यवसाय वेगाने विकसित झाला. मेक्सिकन साहित्य परंपरेत ॲझटेक, माया आणि इतर इंडियन जमातींच्या लोकवाङ्मयाचा यामध्ये मोठा वाटा आहे.
हे लोकसाहित्य आता स्पॅनिश भाषेतून प्रकाशित झाले आहे. या साहित्यात सृष्टी निर्मितीच्या पुराणकथा, धार्मिक विधींच्या कहाण्या, त्याचप्रमाणे पारंपरिक वैद्यक, शेती, सण-उत्सव यासंबंधीच्या गोष्टींचाही अंतर्भाव होतो. वसाहतकाळात कोर्तेझने स्पेनच्या राजाला लिहिलेली पाच पत्रे सुद्धा प्रसिद्ध आहेत.
लोक व समाजजीवन :
मेक्सिकोतील सध्याचा समाज हा ॲझटेक, माया, झपोटेक इ. अनेक इंडियन जमाती आणि स्पॅनिश वसाहतकार यांच्या वांशिक-सांस्कृतिक मिश्रणातून तयार झाला आहे. आफ्रिकेतील कृष्णवर्णीय हे अल्प प्रमाणात गुलाम म्हणून वसाहत काळात येथे आले. मेक्सिकन समाजात वांशिक भेदांपेक्षा सांस्कृतिक भेद महत्त्वाचे मानले जातात. मेक्सिकन समाजात पारंपरिक ग्रामव्यवस्थेत मोठे जमीनदार आणि बहुसंख्य मजूर अशी रचना होती.
क्रांतीनंतरच्या काळात जमिनीचे फेरवाटप झाल्याने ही रचना मोडकळीला आली. 1940 नंतर वाढते औद्योगिकीकरण व नागरीकरण यांमुळे उद्योजक, राजकीय नेते, व्यापारी, तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ आणि व्यावसायिक असे नवे प्रभावी वर्ग समाजात निर्माण झाले. आता समाजात ग्रामीण शहरी तसेच प्रादेशिक व सामाजिक वर्ग त्यांची वैशिष्ट्ये दिसून येतात. शेतकरी आणि शेतीउत्पन्न यांची पाहिजे तशी प्रगती होऊ शकली नाही.
खेळ :
मेक्सिकोमधील लोकप्रिय खेळांत बेसबॉल, सॉकर फुटबॉल, व्हॉलीबॉल, पोहणे इ. खेळ लोकप्रिय असून बैलझोंबी हा मेक्सिकोचा राष्ट्रीय खेळ आहे. मेक्सिको सिटीमध्ये बैलझोंबीची दोन रंगणे आहेत. त्यांपैकी ‘प्लाझा दे तोरोस मॉन्युमेंटल’ हे जगातील सर्वांत मोठे असून त्यात 50,000 प्रेक्षक एकाच वेळी बसू शकतात.
संगीत व नृत्य :
मेक्सिकोमध्ये धार्मिक विधी-उत्सवांतून संगीत-नृत्याला फार महत्त्वाचे स्थान होते. उत्सवाच्या प्रसंगी संगीताच्या तालावर नृत्ये केली जात, त्या संगीतातील वाद्यांचा प्रमुख संचालक व गायक यांचे उल्लेख सापडतात. माया संस्कृतीतील उपलब्ध भित्तिलेपचित्रांमध्ये शंख, तुताऱ्या, बासऱ्या, शिट्ट्या, हिरणाच्या शिंगांनी वाजवली जाणारी कासवाची कवचे, लाकडी ओबो, निरनिराळे ढोल आदींची चित्रे पाहावयास मिळतात.
‘तुंकुल’ नामक विशिष्ट लाकडी ढोल हे प्राचीन काळातले प्रमुख वाद्य होते. त्यास ॲझटेकांमध्ये ‘तेपोनाझत्ली’ हे नाव होते. शंख व तुंकुल वाद्यांचा गजर करून लोकांना देवळात जमवत असत व उत्सव साजरा करत असत.
पर्यटन स्थळ :
प्राचीन माया, ॲझटेक संस्कृतींचे भव्य अवशेष मेक्सिको सिटी व परिसरातपहावयास मिळतात. मेक्सिको सिटी हे राजधानीचे शहर असून येथे इंडियन वसाहतकालीन व आधुनिक अशा विविध संस्कृतींचा उगम येथे झाल्याचे दिसते. दक्षिणेकडील पॅसिफिक महासागरकाठी सुंदर पुळणी व निसर्गसौंदर्य यांनी उत्कृष्ट बनलेली स्थळे आहेत.
यूकातान द्विपकल्पातील वनांनी व्याप्त अश्या पुळणी, तेथील चकाकती रुपेरी वाळू व स्वच्छ निळे पाणी यांमुळे या भागाला वेगळेच आकर्षण निर्माण झाले आहे. मेक्सिकोच्या आखातावरही सागरी सौंदर्याची स्थळे आपणास पहावयास मिळतात .
ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.
हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-
- Child Labour Essay In Marathi
- Doordarshan Essay In Marathi
- Essay On Metro Rail In Marathi
- Essay On World Wildlife Day In Marathi
- My Country India Essay In Marathi
- Subhash Chandra Bose Essay In Marathi
- My School Essay In Marathi
- Essay On Makar Sankranti In Marathi
FAQ
मेक्सिको कशासाठी प्रसिद्ध आहे?
मेक्सिकोची समृद्ध संस्कृती, प्राचीन अवशेष, चमकदार किनारे आणि अविश्वसनीय पाककृती यासाठी ओळखले जाते.
मेक्सिकोचे पूर्ण नाव काय आहे?
युनायटेड मेक्सिकन स्टेट्स
मेक्सिको कोणत्या प्रकारचा देश आहे?
फेडरल प्रजासत्ताक
मेक्सिको सिटी इतके प्रसिद्ध का आहे?
मेक्सिको सिटी हे खास आहे कारण ते एका तलावावर बांधलेल्या प्राचीन अझ्टेक राजधानी शहराच्या अवशेषांवर उभे आहे.
मेक्सिको हा श्रीमंत देश आहे की गरीब?
राजधानी आणि सर्वात मोठे शहर मेक्सिको सिटी आहे.