सरकारी योजना Channel Join Now

जालना जिल्ह्याची संपूर्ण माहिती Jalana District Information In Marathi

Jalana District Information In Marathi हा जिल्हा मराठवाड्यातील एक भाग म्हणून ओळखला जात असला तरी त्याचे वेगळे वैशिष्य आहे. जालना जिल्‍ह्याचे मुख्‍यालय जालना शहर असून ते महाराष्ट्र राज्‍याच्‍या व भारताच्या  राजधानीशी ब्रॉडगेज रेल्‍वे लाईनने जोडलेले आहे.  या जिल्ह्याला वेगळा असा इतिहास आहे. तर चला मग पाहूया जालना या जिल्ह्याविषयी विस्तृत माहिती.

Jalana District Information In Marathi

जालना जिल्ह्याची संपूर्ण माहिती Jalana District Information In Marathi

क्षेत्रफळ व विस्तार :

जालना या जिल्ह्याचे क्षेत्रफळ 7,687.39 वर्ग कि.मी. आहे. महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत जालना जिल्ह्याने राज्याच्या एकूण भागापैकी 2.51 % भाग व्यापलेला आहे. जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी 1.32 टक्के म्हणजेच 102.0 चौ.कि.मी क्षेत्रफळ शहरी भाग आहे.

जालना जिल्हा 19.1 ते 20.3 या उत्तर अक्षांश व 75.4 रेखांश  ते 76.4  या पूर्व रेखांशामध्ये वसलेला आहे.  जिल्हयाचे स्थान राज्यात साधारणपणे मध्यभागी आहे. जिल्हयाच्या उत्तर सीमेवर जळगाव, पुर्वेस बुलढाणा व परभणी, दक्षिणेकडे बीड, व पश्चिमेकडे औरंगाबाद हे जिल्हे वसलेले आहेत.

जालना जिल्ह्याचे हवामान :

जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान 650-750 मि.मी. इतके आहे. तरीसुद्धा अनेक वेळा जिल्ह्यात दुष्काळ पडतो. जिल्ह्याचा उन्हाळा कडक असतो. जिल्ह्याचा 95% भाग हा गोदावरी नदीच्या खोऱ्यात येतो.

जालना जिल्हयात एकुण 8 तालुके आहेत.

जालना, अंबड, भोकरदन, बदनापूर, घनसावंगी, परतूर, मंठा, जाफ्राबाद.

शेती व प्रमुख पिके :

जालना जिल्ह्यातील ज्वारी मुख्य पीक असून, ते दोन्ही हंगामांत घेतले जाते. या जिल्ह्यातील खरीप हंगामात ज्वारी, बाजरी, कापूस, मूग, तूर, उडीद, भुईमूग ही पिके घेतली जातात आणि रब्बी हंगामात गहू, ज्वारी, करडई व सूर्यफुलासारखी गळिताची पिके घेतली जातात.

जिल्ह्याच्या दक्षिण व आग्नेय भागातील अंबड, घनसावंगी, परतूर व मंठा या तहसीलींमध्ये जमीन काळी व सुपीक आहे. या जमीनीत कापसाचे व रब्बीचे पीके चांगल्या प्रमाणात येते. जिल्ह्याच्या उत्तर भागात विहिरी खोदल्या जाऊ शकत असल्या तरी जमिनीतील पाण्याची पातळी अतिशय खोल असून भूगर्भातील पाणी अपुऱ्या प्रमाणात आढळते. ते बारमाही पिकासाठी अपुरे पडते.

वनक्षेत्र :

जिल्ह्यात वनक्षेत्र फारच कमी व तुरळक असून उत्पादनाच्या दृष्टीने हलक्या दर्जाचे आहे. उपवनसंरक्षक, वनविभाग, औरंगाबाद, यांचेकडील उपलब्ध माहितीनुसार जालना जिल्ह्यातील जंगलव्याप्त क्षेत्र 101.18 चौ. कि.मी. आहे. एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ते 1.31% येते. महाराष्ट्र राज्यात 5214 हजार हेक्टर जंगलव्याप्त क्षेत्र असून त्याची भौगोलिक क्षेत्राची टक्केवारी 16.92 % आहे.

राज्यातील बाकी एकूण जंगलव्याप्त क्षेत्राशी जिल्ह्याच्या वनक्षेत्राशी तुलना करता फक्त 0.12% येते. यावरून जिल्ह्यातील जंगलव्याप्त क्षेत्र खूपच कमी असल्याचे दिसून येते. सामाजिक वनीकरण विभागामार्फत गावातील गायरान जमिनी व रस्त्याच्या कडेने वर्गीकरण केले जात आहे.

नद्या :

जिल्हयाच्या दक्षिण सिमेलगत गोदावरी नदी अंदाजे 60 कि.मी. इतकी जिल्ह्यातुन वाहते. त्यामुळे जिल्हयाचा दक्षिण भाग गोदावरीच्या खोऱ्यात मोडतो. दुधना व गल्हाटी या गोदावरीच्या उपनदया मध्य भागातून तर उत्तर भागातून पुर्णा, खेळणा व गिरजा या उपनदया वाहतात. कुंडलिका ही दुधनाची उपनदी जालना शहरातुन वाहते.

जिल्ह्यात एकूण गावे :

2011 च्या जनगणनेनुसार या जिल्ह्यात एकूण 971 गावे आहेत. यापैकी 963 गावे वस्ती असलेली व 8 ओसाड गावे आहेत. जिल्ह्यात 806 स्वतंत्र ग्रामपंचायती व 157 गटग्रामपंचायती आहेत. या आकडेवारीमध्ये काळानुसार बदल झालेला आहे.

जिल्ह्यात एकूण आठ तालुके आहेत. त्यांची नावे भोकरदन, जाफ्राबाद, जालना, बदनापूर, अंबड, घनसावंगी, परतूर, मंठा अशी आहेत. या जिल्ह्यात जालना, अंबड, भोकरदन, परतूर व मंठा या पाच ठिकाणी कृषि उत्पन्न बाजार समिती कार्यरत आहे.

जालना जिल्ह्याचा इतिहास :

जिल्ह्यातील जालना शहराला मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. हे शहर पूर्वी माती आणि विटांच्या भिंतींनी पूर्णपणे सुरक्षित करण्यात आलेले होते. मात्र, आता या शहरात मुर्ती दरवाजा आणि हैद्राबाद दरवाजा असे फक्त दोन दरवाजे शिल्लक आहेत. राजा अकबराच्‍या काळामध्‍ये जालना हे शहर अकबरच्‍या एका अधिकाऱ्याला जहागीर म्हणून देण्यात आलेले होते.

काही काळासाठी अबुल फजलने या ठिकाणी वास्‍तव्‍य केल्याची नोंद आहे. निजाम-उल-मुल्‍क असफ जहॉ याने या शहराबद्दल काही लिहून ठेवलेले आहे. यामध्ये त्याने औरंगाबादपेक्षाही हे शहर राहण्यासाठी पोषक असल्याचं म्हटलेलं आहे.

1725 साली त्याने काबिल खान याला जालना शहराच्या पूर्वेला एक किल्‍ला बांधण्‍यास सांगितले हेाते. या किल्ल्याचे नाव आज मस्‍तगड आहे. जालना शहराचा जमीन महसूल मराठे गोळा करत असत. मात्र यामध्ये नेहमी बदल होत असे.

मराठा सत्‍तेचे वर्चस्‍व कमी झाल्‍यानंतर शेवटी हैद्राबादच्‍या निजामाकडे या ठिकाणाची सत्‍ता गेली होती. पुढे 1855 मध्‍ये रोहीले आणी कंपनी सत्‍तेमध्ये लढाई झाली होती. या लढाईत दोन्‍ही बाजुचे साधारणतः 100 पेक्षा अधिक सैनिक मरण पावले किंवा जखमी झाले होते. नंतर या लढाईत रोहील्‍यांना शरणागती पत्‍कारावी लागली होती.

उद्योग व कारखाने :

जिल्ह्यात एकूण 116 नोंदणी झालेले कारखाने असुन या कारखान्यातील कामगार संख्या 2667 इतकी आहे. त्यापैकी 14 कारखाने बंद आहेत. 2008 मध्ये तर दर लाख लोकसंख्येमागे या कारखान्यातील कामगारांची संख्या 165 होती. धान्य गिरणी उत्पादनांसंबधी 20 चालू कारखाने असून त्यात 229 कामगार आहेत.

मूलभूत लोह व पोलादाचे उत्पादन करणारे 34 चालू कारखाने असून त्यांत 1519 कामगार आहेत. जिल्ह्यातील कारखान्यांमधून 2008 साली कामगारांनी काम केलेल्या श्रमदानांची संख्या 4.73 लक्ष आहे, ही मागील वर्षीपेक्षा कमी आहे.

वाहतूक व्यवस्था :

जालना रेल्वे स्थानक हे दक्षिण मध्य रेल्वेच्या  मनमाड-सिकंदराबाद मार्गावर आहे. जालन्याहून भारताच्या अनेक प्रमुख शहरांसाठी थेट प्रवासी रेल्वे सेवा उपलब्ध आहे. मुंबईहून औरंगाबाद पर्यंत  धावणारी जनशताब्दी एक्सप्रेस ऑगस्ट 2015 मध्ये जालन्यापर्यंत वाढवण्यात आली. या व्यतिरिक्त तपोवन एक्सप्रेस, देवगिरी एक्सप्रेस.  नंदीग्राम एक्सप्रेस, अजिंठा एक्सप्रेस इत्यादी गाड्या जालन्याहून रोज धावतात.

पर्यटन स्थळ :

जालना जिल्ह्यात जांबसमर्थ, मजार-इ-मौलया नुरुद्दीन साहेब दर्गा शरीफ, मत्‍स्‍योदरी देवी मंदिर, गुरू गणेश तपोधाम, श्री गणपती मंदीर, मस्तगड हे ठिकाण पाहण्यासारखे आहेत.

जालना किल्ला, जालना :

निजाम उल मुल्क असफ जेह यांनी सन 1725 मध्ये शहराच्या पूर्वेला जालना किल्ला बांधण्यास सांगितले त्याला ‘मस्तगड’ म्हणून ओळखले जाते. किल्याच्या बांधकामावर फारसी शिलालेख आढळतात. या किल्ल्याचा आकार चतुष्कोणीय आहे. तसेच या किल्ल्याच्या कोपऱ्यात अर्ध परिपत्रक बुरुज आहेत.

जांबसमर्थ, घनसावंगी :

हे ठिकाण धार्मिक स्थळ आहे. येथे संत रामदास स्वामी यांचा जन्म झाला. जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात हे ठिकाण आहे. येथे राम मंदिरामध्‍ये दरवर्षी राम नवमीनिमित्‍त यात्रा भरते.

गुरू गणेश तपोधाम :

जैन धर्मियांसाठीचे हे एक पवित्र ठिकाण म्हणून ओळखले जाते. गुरु गणेश तपोधाम याला कर्नाटक केसरी म्हणूनदेखील ओळखले जाते. श्री वर्धमान स्‍थानकवासी जैन श्रावक संघ या जैन ट्रस्‍टमार्फत या धार्मिक स्‍थळाची देखरेख व निगा राखली जाते.

मत्‍स्‍योदरी देवी मंदिर, अंबड :

येथे मत्योदरी देवीचे भव्य मंदिर आहे. जालना शहराच्या दक्षिणेला 21 किमी अंतरावर हे मंदिर आहे. ज्या टेकडीवर देवीचे मंदिर आहे, त्याचा आकार हा मासोळीसारखा असल्यामुळे या मंदिराल मत्योदरी देवीचे मंदिर म्हटले जाते. हे मंदिर जवळपासच्‍या क्षेत्रातील अत्‍यंत जुन्‍या मंदिरांपैकी एक आहे.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Child Labour Essay In Marathi

Doordarshan Essay In Marathi

Essay On Metro Rail In Marathi

Essay On World Wildlife Day In Marathi

My Country India Essay In Marathi

Subhash Chandra Bose Essay In Marathi

My School Essay In Marathi

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment