बुलढाणा जिल्ह्याची संपूर्ण माहिती Buldhana District Information In Marathi

Buldhana District Information In Marathi बुलढाणा हा महाराष्ट्रातील अमरावती विभागातील एक छोटा जिल्हा आहे. विदर्भाचे महाद्वार म्हणून हा जिल्हा ओळखला जातो. त्याचे नाव भिल थानावरून आले आहे, याचा अर्थ भिल बुलढाणा जमातीचे निवासस्थान आहे. बुलढाणा हे असे ठिकाण आहे, जिथे भिल्लांचे मोठे समूह राहत होते. हे ठिकाण महाभारत काळात बेरार प्रांताचा एक भाग होते. तेथे अनेक पर्यटन स्थळ देखील आहे. तर चला मग पाहूया बुलढाणा या जिल्ह्यात विषयीची माहिती.

Buldhana District Information In Marathi

बुलढाणा जिल्ह्याची संपूर्ण माहिती Buldhana District Information In Marathi

क्षेत्रफळ व विस्तार :

बुलढाणा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ विभागातील एक जिल्हा. 19° 51′ उ. ते 2°17′ उ. अक्षांश व 75° 57′ पू. ते 76° 49′ पू. रेखांश यांदरम्यान पसरलेल्या बुलढाणा जिल्हयाचे क्षेत्रफळ 9,745 कि.मी असून बुलढाणा विदर्भात पश्चिमेकडे येणारा जिल्हा आहे, बुलढाण्याच्या उत्तरेला मध्यप्रदेश, पुर्वेकडे अकोला, वाशिम, आणि अमरावती जिल्हा, दक्षिणेकडे जालना आणि पश्चिमेकडे जळगाव व औरंगाबाद जिल्हा आहे.

लोकसंख्या :

बुलढाणा जिल्ह्यातील 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या 2,586,258 असून साक्षरतेचे प्रमाण 82.09% आहे. जिल्ह्यातील जंगल व्याप्त व डोंगराळ भागात अदिवासी लोक राहतात. येथील आदिवासींत  बंजारा, कोरकू,  पारधी, नीहाल इ. प्रमुख जमाती आहेत.

ह्या जिल्ह्यातील जळगाव तालुक्यात कोरकू व नीहाल आणि मेहेकर व चिखली तालुक्यात बंजारा जमातीची वस्ती आढळते. येथील लोकांच्या पेहेरावात महाराष्ट्रातील इतर शहरांप्रमाणेच आधुनिकता आलेली दिसून येते. मात्र खेडेगावांमध्ये धोतर अथवा पायजमा, सदरा असा पुरुषांचा, तर स्त्रियांचा नऊवारी साडी व चोळी असा पोषाख असतो.

बुलढाणा जिल्ह्यातील तालुके :

बुलढाणा जिल्ह्यात एकूण 13 तालुके आहेत ते पुढीलप्रमाणे. बुलढाणा, चिखली, देउळगांव राजा, खामगांव, शेगांव, मलकापुर, मोताळा, नांदुरा, मेहकर, लोणार, सिंदखेड राजा, जळगांव जामोद, संग्रामपुर.

हवामान :

बुलढाणा जिल्ह्यात  मे हा सर्वात जास्त तपमानाचा महिना असून या महिन्यात दक्षिण भागाचे तपमान 26° से. पर्यंत असते तर उत्तर भागात 27.4° से. ते 42.3° से. पर्यंत असते. काही वेळा ते 47° से. पर्यंतही जाते.

हिवाळ्यातील डिसेंबर महिना कडक थंडीचा असून या काळात दक्षिण भागाचे तापमान 15.1° से. ते 27.6° से. पर्यंत असते. तर उत्तर भागात ते 3° से. पर्यंत खाली येते. तपमानाप्रमाणेच पर्जन्यमानातही स्थलपरत्वे फरक आढळतो. जिल्ह्यात वार्षिक सरासरी 79.6 सेंमी पाऊस पडतो. पावसाचे प्रमाण दक्षिणेकडून उत्तरेकडे कमीकमी होत जाते.

इतिहास :

बुलढाणा जिल्ह्याविषयीचा सुस्पष्ट असा प्राचीन इतिहास फारसा आढळत नाही. येथील लोणार सरोवर व मेहेकर या ठिकाणांविषयी पुराणांतून उल्लेख आढळतात. सत्ययुगात लोणार सरोवर ‘बैरज तीर्थ’ या नावाने ओळखले जात असे. मेहेकर गावाविषयी काही आख्यायिका प्रचलित आहेत. या परिसरात मध्ययुगीन मंदिरांचे अवशेषही आढळतात. प्राचीन कुंतल देशात हा प्रदेश समाविष्ट होता.

काही ऐतिहासिक निर्देशांकानुसार हा प्रदेश सम्राट अशोकाच्या साम्राज्यात होता त्यानंतर या प्रदेशावर सातवाहनांचे साम्राज्य आले. जिल्ह्यातील रोहनखेड येथे 1437 मध्ये अलाउद्दीन शाह याचा सेनापती व खानदेशचा सुलतान यांच्यात आणि 1590 मध्ये बुऱ्हाण निजामशाह व जमालखान यांच्यात लढाया झाल्या. 1724 मध्ये साखरखेर्डा येथे निजामुल्मुल्क आसफजाह व मोगल सरदार मुबारीझखान यांच्यात लढाई होऊन आसफजाहास जय मिळाला.

दुसऱ्या इंग्रज-मराठे युद्धापूर्वी 1803 मध्ये दौलतराव शिंदे व रघुजी भोसले यांचा या जिल्ह्यातील मलकापूर येथे तळ होता, असा उल्लेख आढळतो. 1853 मध्ये बुलढाणा हा प. बेरार विभागाचा एक भाग म्हणून जाहीर करण्यात आला. 1864 मध्ये याला स्वतंत्र जिल्हा म्हणून मान्यता मिळाली व 1867 मध्ये बुलढाणा शहर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण झाले.

शेती व्यवसाय व पिके :

बुलढाणा जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेचा शेती हाच मुख्य आधार असून या व्यवसायात जिल्ह्यातील एकूण कामकऱ्यांपैकी 85% लोक शेती हा व्यवसाय करतात. बुलढाणा जिल्ह्यातील मुख्य पिकांमध्ये कापूस,ज्वारी, सोयाबीन, सुर्यफुल हे या जिल्ह्यातील महत्वाचे पिके आहेत. खामगाव, मलकापूर हे महत्वाचे औद्योगिक शहरे आहेत.

जिल्ह्यातील बहुतेक शेती पावसावरच अवलंबून असल्याने, जास्त उत्पन्नाच्या दृष्टीने संकरित ज्वारीसारखी पिके अन्नधान्य म्हणून तर कापूस, भुईमूग, ऊस ही नगदी पिके म्हणून घेतली जातात.  गहू, हरभरा, करडई ही पिके मेहेकर व चिखली तालुक्यांत जास्त होतात. या पिकांशिवाय विड्याची पाने विशेषतः जळगाव, चिखली तालुक्यात मोठ्या प्रमाणात घेतली जातात. केळी, संत्री, मोसंबी, द्राक्षे इ. बागायती पिकेही या जिल्ह्यात घेतली जातात.

इतर उद्योग :

शेतीच्या पिका व्यतिरिक्त बुलढाणा जिल्ह्यात उद्योग मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामध्ये हातमाग (देऊळगाव राजा, नांदुरा), घोंगड्या बनविणे (सिंदखेड राजा), चामडी कमविणे, अडकित्ते तयार करणे (देऊळघाट), तेलघाण्या इ. लहानमोठे उद्योग चालतात.

मेहेकर तालुक्यातील दुसरबीड येथे जिजामाता सहकारी साखर कारखाना असून त्यात एकूण 500 कामगार काम करतात. अन्नप्रक्रिया, कापड, कागद व कागद उत्पादने, लहान यंत्रसामग्री व दुरूस्ती इत्यादींच्या कारखान्यांचा समावेश होता. यांशिवाय जिल्ह्यात पशुपालन व दुग्धोत्पादन, कुक्कुटपालन, मासेमारी, जंगल उत्पादन इ. अन्य व्यवसाय चालतात.

प्रमुख नद्या :

पैनगंगा व पूर्णा या जिल्ह्यातील प्रमुख नद्या असून त्यांशिवाय काटेपूर्णा, नळगंगा,विश्वगंगा, ज्ञानगंगा, बाणगंगा (वान), कोराडी, धामणी इ. अन्य नद्याही आहेत. माण हि उत्तरवाहिनी नदी बुलढाणा पठारावर उगम पावून काही अंतर बुलढाणा-अकोला जिल्ह्यांच्या सरहद्दीवरून वाहत जाऊन पूर्णा नदीस मिळते. म्हैस, तोरणा, विश्वामित्री या बुलढाणा जिल्ह्यातील तिच्या उपनद्या होत. माण नदी बारमाही वाहते.

वनस्पती व प्राणी :

जंगलात पानझडी वृक्षांचे प्रमाण जास्त असून त्यात साग, अंजन, बाभूळ, सालई, निंब, हिवर तसेच आंबा, चिंच, बोर, पिंपळ, शिंदी, तिवस, करंज इ. वृक्षप्रकार आढळतात. जळगाव भागातील  अंबाबरवा, मेहेकर तालुक्यातील घाटबोरी चिखली तालुक्यातील गुम्मी व खामगाव तालुक्यातील  गेरूमाटरगाव इ. जंगले प्रसिद्ध आहेत. गेरूमाटरगाव जंगलात चंदनाची झाडे आहेत.

बुलढाणा जिल्ह्यातील जंगलांतून बिबळ्या, रानबोका, कोल्हा, तरस, लांडगा, रानडुक्कर इ. हिंस्त्र प्राणी तसेच सांबर, नीलगाय, चितळ, अस्वल हेही आढळतात. वाघ मात्र क्वचितच दिसतो. काळ्या तोंडाची वानरे, विषारी, बिनविषारी सर्प सर्वत्र दिसतात. मोर, ससाणा, कोकीळ, निळी व पांढरी कबुतरे, तितर, लावा इ. पक्षी सर्वत्र आढळतात.

पर्यटन स्थळ :

बुलढाणा जिल्ह्यात बरीच पर्यटन स्थळे आहेत. या पर्यटन स्थळांना वर्षभर पर्यटक भेट देत असतात. त्यामध्ये, लोणार क्रेटर लेक, ज्ञानगंगा अभयारण्य, हनुमान मंदिर, मस्त कलंदर दर्गा आणि बरीच ठिकाणे लोकांना वेगवेगळ्या दिशांनी आकर्षित करतात.

सिंदखेड राजा :

राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंधखेड येथे झाला. राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या. सध्या हे एक ऐतिहासिक ठिकाणच नाही तर पर्यटन स्थळ म्हणून देखील विकसित झालेले दिसते.

लोणार सरोवर :

लोणार सरोवर हे बुलढाणा जिल्ह्यातील खाऱ्या पाण्याचे सरोवर असून ते उल्कापातामुळे निर्माण झाले आहे. बेसाल्टच्या खडकातील हा एकमेव मोठा सरोवर आहे. त्याचे पाणी क्षारीय आहे. लोणार सरोवराचे संवर्धन करण्यासाठी लोणार सरोवरला वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित केले गेले.  येथे सुमारे 1250 वर्षांपूर्वीची मंदिरे आहेत. यापैकी 15 मंदिरे उलटली आहेत.

नीलकंठेश्वर मंदिर :

नीलकंठेश्वराचे प्राचीन मंदिर आहे, राजा लखुजीराव जाधव यांनी मंदिराच्या पुनरुज्जीवनासाठी कोरलेला शिलालेख. या मंदिरासमोरील चौकात पायऱ्यांनी पायऱ्यांनी व्यवस्था केलेली भव्य पट्टी आहे. रामेश्वर मंदिराचे बांधकाम 8 व्या ते 10 व्या शतकातील असून ते हेमाडपंथी आहे.

शेगाव, आनंद सागर :

श्री संत गजानन महाराज यांचे मंदीर असलेल्या या गावाला विदर्भाची पंढरी म्हणून ओळखले जाते. संत गजानन महाराज प्रगटदिन आणि रामनवमीला येथे मोठी यात्रा भरते. शेगाव आणि आसपासच्या भागात पाण्याची कमतरता आहे आणि म्हणूनच श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव यांना शेगावमध्ये मुबलक पाणी असलेल्या तलावाची गरज भासली ज्यामुळे पाण्याची टंचाई दूर होण्यास मदत होईल.

या उद्देशाने, श्री संस्थानने शेगावमध्ये कृत्रिम तलाव निर्माण केला, माण नदीतून आनंद सागर तलावात पाणी उचलून आणले. परंतु मासिक खर्च रु. या उद्देशासाठी 50 लाखांमुळे संस्थानवर आर्थिक बोजा पडला. त्यानंतरही, संस्थानने शेगावच्या आसपासच्या परिसरातील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी आनंद सागर तलावाचा प्रकल्प राबवला. येथे अनेक पर्यटक येत असतात त्यांची नाव मात्र फी घेतल्यामुळे पाण्याचा खर्च भरून निघतो.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Essay On Importance Of Cleanliness In Marathi

Essay On Save Electricity In Marathi

My Best Friend Essay In Marathi

Essay On Tree In Marathi

My Country India Essay In Marathi

Subhash Chandra Bose Essay In Marathi

My School Essay In Marathi

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment